मुंबई: आताच्या घडीला राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि भाजप यांमध्ये दावे-प्रतिदावे होताना दिसत आहेत. यातच भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली. या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीसांनी आता महाराष्ट्रात आग लावण्याचे धंदे बंद करावेत, असा सांगत देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त केला.
कधीही उठसूठ शरद पवार यांच्याबद्दल काहाही बोलायचे. ज्ञानवापी मंदिर, ओबीसी आरक्षण आणि आता संभाजीराजेंच्या नावानेही राजकारण करुन मराठा, ओबीसी यांना पवारांविरोधात उभे करण्याचे आगलावे धंदे देवेंद्र फडणवीसांनी बंद करावेत, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली.
शरद पवारांचे नाव गोवण्याचा प्रयत्न केला तर...
देवेंद्र फडणवीसांना सगळीकडेच शरद पवारच दिसतात का? त्यांच्या वक्तव्याला काही आधार नाही, अगदी बिनबुडाचे वक्तव्य आहे. शरद पवारांबद्दल बोलताना त्यांनी भान ठेवावे आणि यापुढे जर कोणत्याही घटनेत शरद पवारांचे नाव गोवण्याचा प्रयत्न केला तर ओबीसी, मराठा आणि महाराष्ट्राची जनता फडणवीसांना माफ करणार नाही. देवेंद्र फडणवीस यांचे हे आग लावणारे वक्तव्य असून त्यांच्या कपटनीतींपासून महाराष्ट्राने सावध राहावे, असे मिटकरी यांनी म्हटले आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
आधी शरद पवारांनी हा सगळा विषय सुरू केला. त्यानंतर ज्या दिशेने तो विषय गेला, ते सगळे वेगळेच काहीतरी झाले आहे. कदाचित त्यांची (संभाजीराजे छत्रपती) कोंडी करण्याचा प्रयत्न यातून झाला आहे. पण तो त्या त्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यावर मी बोलण्याचे कारण नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरात पत्रकारांशी बोलताना म्हटले होते.