Maharashtra Politics: दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि शिवसेना एकमेकांसमोर उभे ठाकले. यातच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बुस्टर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला मिळाल्यावरूनही अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना कथित १०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी जामीन मंजूर झाला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
कथित १०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ११ महिन्यांपासून आर्थररोड कारागृहात असलेले राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेरीस उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र, देशमुख यांच्यावर भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांना जामीन मंजूर झालेला नाही. त्यामुळे देशमुख यांचा मुक्काम आर्थररोड कारागृहातच राहणार आहे. देशमुख यांचा जामीन मंजूर केला असला, तरी ईडीने सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी या आदेशावर स्थगिती देण्याची विनंती केली. न्यायालयाने ती मान्य करत, देशमुख यांच्या जामीन आदेशावर १३ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली. यानंतर अमोल मिटकरींनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
भाजपने जाणीवपूर्वक घडवून आणलेले कटकारस्थान होते
न्यायव्यवस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्ण विश्वास आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे दोन्ही प्रकरणे भाजपाने जाणीवपूर्वक घडवून आणलेले कटकारस्थान होते. त्यामुळे आता केवळ एक जामीन मिळाला आहे, येत्या काही दिवसांत नवाब मलिकही बाहेर येतील, असा विश्वास अमोल मिटकरींनी व्यक्त केला. तसेच अनिल देशमुख यांना गेल्या ११ महिन्यांत शारीरिक व मानसिक त्रास झाला असेल. मात्र, उशीरा का होईना अनिल देशमुख यांना न्याय मिळाला आहे. महत्त्वाचे म्हणजे या ११ महिन्यांच्या तपासांत काहीही निष्पन्न झालेले नाही. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की, आज त्यांना जामीन मिळाला आहे, लवकरच ते या प्रकरणातून निर्दोष मुक्त होतील, असे अमोल मिटकरी म्हणाले.
दरम्यान, अनिल देशमुख यांना जामीन मिळाला असला, तरी भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांना जामीन मिळालेला नाही. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांतर्गत जामीन मिळूनही देशमुख यांना कारागृहातच राहावे लागणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"