मुंबई: आताच्या घडीला राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Vidhan Parishad Election 2022) राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. राज्यसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढला असला, तरी या पराभवाचा वचपा काढण्यासाठी महाविकास आघाडीने जय्यत तयारी केली आहे. विधान परिषद निवडणुकीत छोटे पक्ष आणि अपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. यामुळे अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या भेटीगाठी वाढताना दिसत आहेत. यातच महाविकास आघाडीसह भाजपच्या नेत्यांनी बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांच्या भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सूचक विधान केले आहे.
बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार आहेत. काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनंतर भाजपच्या मनीषा चौधरी यांच्यासह अन्य नेत्यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भाजपवर बोचरी टीका केली आहे.
‘देवेंद्र’पेक्षा ‘हितेंद्र’ पॉवरफुल ठरणार
अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केले असून, ‘देवेंद्र’पेक्षा ‘हितेंद्र’ पॉवरफुल ठरणार. कितीही लोटांगण घाला, असा टोला यामध्ये लगावण्यात आला आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची खेळी राज्यसभा निवडणुकीत अतिशय जबरदस्त ठरली होती. त्यामुळेच भाजपचा विजय झाला. शेवटच्या क्षणापर्यंत भाजपने आपले पत्ते खुले केले नाहीत. राज्यसभेचा निकाल लागेपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अन्य नेत्यांनी विधिमंडळातच तळ ठोकला होता. यानंतर आता भाजपची रणनीति नेमकी काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
हितेंद्र ठाकूर यांच्या भूमिकेकडे लक्ष
राज्यसभा निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची मते फुटली नाहीत. तर अपक्ष आणि लहान पक्षांनी कोणाच्या पारड्यात मतदान केले याचे आखाडे अजूनही बांधले जात आहेत. त्यातच विधान परिषदेची निवडणूक ही गुप्त मतदानाने पार पाडली जाते. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप कोणतीही जोखीम घेण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. विधानसभेतील लहान पक्ष आणि अपक्षांना वळवण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न सुरू आहेत. यातच बहुजन विकास आघाडीकडे हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर व राजेश पाटील अशी तीन मते आहेत. या तीन मतांसाठी हितेंद्र ठाकूर यांच्याशी चर्चा सुरू आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी हितेंद्र ठाकूर काय भूमिका घेतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची २७ मतांची आवश्यकता आहे. राज्यसभेप्रमाणे मतदान झाले तर भाजपकडे १२३ संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपच्या ४ जागा सहज निवडून येऊ शकतात. पाचव्या उमेदवारासाठी भाजपला १२ मते कमी पडतात. तर दुसरीकडे, महाविकास आघाडीकडे १६१ संख्याबळ आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आमदार विधानपरिषदेत जातील. तसेच मित्र पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने काँग्रेसच्या वाट्यालाही दोन जागा येऊ शकतात.