शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याचे समोर आले आहे. यावरुन आता राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर पन्नास खोकेवरुन टीका केली होती, या टीकेला प्रत्युत्तर देताना मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवी दिली असल्याचे समोर आले आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (NCP Amol Mitkari) यांनी अब्दुल सत्तार यांना इशारा दिला आहे.
"सुप्रियाताई बद्दल वापरलेले अपशब्द 24 तासांच्या आत दिलगिरी व्यक्त करून परत घ्या. नाहीतर तुम्हाला महाराष्ट्रात फिरणे अवघड होईल" असं म्हटलं आहे. अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "अब्दुल सत्तार आम्ही तुम्हाला मोठे अलंकार देऊन बोलू शकतो. मात्र आमच्या पक्षाची ती संस्कृती नाही. आदरणीय सुप्रियाताई बद्दल वापरलेले अपशब्द 24 तासांच्या आत दिलगिरी व्यक्त करून परत घ्या. नाहीतर तुम्हाला महाराष्ट्रात फिरणे अवघड होईल" असं मिटकरींना ट्विटमध्ये म्हटलं आहे.
"दोन दिवसांपूर्वी सत्तेतील आमदार गुलाबराव पाटील यांनीही एक वक्तव्य केलं होतं, त्यावरूनही संतापाचे वातावरण निर्माण झाले होते आणि सत्तेचा माज असलेले कृषीमंत्री अब्दुल सत्तार... वेळ पडली तरी मीही त्यांना अपशब्द चॅनलवर वापरू शकतो. परंतु ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यामुळे मला संस्कृतीच्या बाहेर जायचं नाही. परंतु जो शब्द अब्दुल सत्तार नावाच्या व्हायात माणसाने वापरला आहे."
"मला माझ्या पक्षाचे संस्कार विसरून पुढची पातळी गाठता येते, मात्र ते शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना खपणार नाही. म्हणून मी संयमाने बोलत आहे. अब्दुल सत्तारांना आमचा अल्टिमेट आहे. 24 तासांच्या आत सुप्रिया सुळेंची नाक घासून माफी मागावी, अन्यथा त्याला महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही. त्याने वापरलेला शब्द हा समस्त स्त्री जातीचा अपमान आहे. त्याला जो सत्तेचा उन्माद झालाय, त्याची मस्ती आम्ही उतरल्याशिवाय राहणार नाही" असं अमोल मिटकरींना म्हटलं आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी असं म्हटलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"