वेदांता-फॉक्सकॉनने आपला सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये सुरू करणार असल्याची घोषणा केली. वेदांता रिसोर्स लिमिटेडचे चेअरमन अनिल अग्रवाल यांच्या ट्विटचा दाखला देत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी भाजपावर सडकून टीका केली आहे. ज्या प्रकल्पासाठी आम्ही सरकारमध्ये असताना खूप प्रयत्न केले, तो फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जातोय आणि त्यासाठी काही मंडळींनी प्रयत्न केला, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे.
लाखो हिंदू तरुण बेरोजगार केले. यामुळे राज्यपाल आणि मोदीजी व शहा यांना आपण नक्कीच खूश केले आहे. महाराष्ट्राची गुंतवणूक गुजरातकडे नेऊन महाराष्ट्राचा मोठा अपमान या सरकारने केला असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "वेदांत फॉक्सकॉन या प्रकल्पामुळे 26 हजार कोटी रुपयांचा महसूल राज्याला मिळणार होता, मात्र महाराष्ट्राची ही गुंतवणूक गुजरातकडे नेऊन महाराष्ट्राचा मोठा अपमान या सरकारने केला आहे" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
"वेदांत फॉक्सकॉन कंपनीला महाविकास आघाडी सरकारने 39 हजार कोटीची सवलत दिली होती तर गुजरात सरकारने 29 हजार कोटीची! तरीही हा प्रकल्प जाणीवपूर्वक गुजरातमध्ये शिंदे सरकारने घालवला. लाखो हिंदू तरुण बेरोजगार केले. यामुळे राज्यपाल आणि मोदीजी व शहा यांना आपण नक्कीच खूश केले आहे" असा खोचक टोला देखील अमोल मिटकरी यांनी लगावला आहे. तसेच लम्पी आजारावरूनही बोचरी टीका केली आहे. "लसींचा स्टॉक गुजरातला पाठवून खासगी डॉक्टरांचा व कंपन्यांचा खिसा भरण्याचे काम एकदम OKK सुरू" असं म्हटलं आहे.
"एकीकडे शेतकरी हवालदील झालाय परतीच्या प्रवासाने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे, तर दुसरीकडे "लम्पी" नावाच्या आजाराने शेतकऱ्यांची गुरे दगावत आहेत. गावात पशुवैद्यकीय दवाखाने शोभेची वस्तू बनली आहेत .लसीकरणासाठी लशीच उपलब्ध नाहीत. "लम्पी" चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या लसीचा बडेजाव सरकार करत आहे त्या लसीकरणामुळेच अनेक शेतकऱ्यांची गुरेढोरे अस्वस्थ असल्याची बातमी पुढे आली आहे. शेतकऱ्यांचे पशुधन वाचविण्याकरिता कुठल्याही ठोस उपाय योजना सरकारकडून नाहीत."
"ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणात पशुधन आहे एखाद्या गावात 500 गुरे असली तर लसीकरण केवळ दहा गुरांचे केले जातेय. लसीकरणाच्या नावाखाली सरकार शेतकरी हिताची पोकळ काळजी दाखवते आहे . लसींचा स्टॉक गुजरातला पाठवून खाजगी डॉक्टरांचा व कंपन्यांचा खिसा भरण्याचे काम एकदम OKK सुरू आहे" असं देखील अमोल मिटकरी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.