Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या ठाकरे गट आणि काँग्रेस नेत्यांनीही याबाबत भाष्य केले. मात्र, यावेळी करण्यात आलेले-प्रतिदावे यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. संजय राऊत आणि नाना पटोले यांनी आमच्या पक्षात लक्ष घालू नये, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी सुनावले आहे.
कोणी कोणाच्या पक्षात लक्ष घालण्यापेक्षा स्वतःच्या पक्षात लक्ष घालावे. तर शरद पवार राज्यभर फिरले म्हणूनच २०१९ च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या जास्त जागा निवडून आल्या. काँग्रेसचे आमदार बोलतात पवार साहेब आले म्हणून आम्ही आमदार झालोय. राष्ट्रवादीत काय सुरू आहे हा आमचा प्रश्न आहे. काँग्रेसने त्यात लक्ष घालू नये त्यांनी चिंतन करावे. संजय राऊत आणि काँग्रेसने लक्ष घालू नये, या शब्दांत अमोल मिटकरींनी निशाणा साधला.
माझ्या पक्षात पातळी सोडून कोणी बोलत नाही
आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही भाजपविरुद्ध लढणार आहोत. महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत. माझ्या पक्षात पातळी सोडून कोणी बोलत नाही. आमच्यामुळे महाविकास आघाडीत कुठेही फुट पडणार नाही. प्रत्येक पक्षाने आचार संहिता पाळावी, असा सल्लाही अमोल मिटकरींनी यांनी यावेळी बोलताना दिला.
दरम्यान, शरद पवारांनी निवडलेल्या समितीची बैठक झाली. या समितीच्या बैठकीत शरद पवारांचा राजीनामा नेत्यांनी एकमताने फेटाळून लावला. शरद पवारांनीच अध्यक्ष राहावे असा बैठकीत ठराव मंजूर करण्यात आला. शरद पवारांच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादी कार्यालयात समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.