Andheri Bypoll 2022: अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडताना दिसल्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपला ही पोटनिवडणूक न लढवण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपने उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. भाजपने माघार घेतल्यामुळे ऋतुजा लटके यांचा विजय सोपा मानला जात आहे. अशातच माघार घेण्याच्या निर्णयावरून भाजपवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका केली जात आहे. ही माघार तुमचा दिवाळी फराळ चवदार होऊ देणार नाही, फटाके वाजायला अंधेरीतून सुरुवात झाली, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी लगावला आहे.
शिवसेनेने उमेदवारी मागे घेण्याच्या निर्णयानंतर भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेनेचे लाखो अग्निवीर पेटलेल्या मशालीची पहिली विजयपताका घेऊन आता आणखी त्वेषाने बाहेर पडतील. याच धगधगत्या मशालीने स्वाभिमानाचे, अस्मितेचे, अन्यायाविरुद्धचे यज्ञकुंड पेटवून त्यात महाराष्ट्र-दुष्मनांच्या, लाचार मिंध्यांच्या समिधा अर्पण करतील! पेटलेली ही मशाल आता महाराष्ट्र आणि देश उजळवून टाकेल! या शब्दांत शिवसेनेने निशाणा साधला आहे. यानंतर आता अमोल मिटकरी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.
फटाके वाजायला अंधेरीतून सुरुवात झाली
अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये, भातखळकर, बावनकुळे, शेलार, राणे , सोमय्या आणि समस्त टीम ला दिवाळी पर्वाच्या शुभेच्छा. ही माघार कदाचित तुमचा दिवाळी फराळ चवदार होऊ देणार नाही. अखेर मशाल पेटली आहे. फटाकळे वाजायला अंधेरीतुन सुरुवात झाली अभिनंदन आणि दिवाळीच्या शुभेच्छा!, असा खोचक टोला अमोल मिटकरी यांनी लगावला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही भाजपवर निशाणा साधला. निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच ऋतुजा लटके उभ्या राहू नये म्हणून प्रयत्न सुरू होते. त्यानंतर त्यांचा राजीनामा मंजूर होऊ नये, यासाठी अनेक अडथळे आणले गेले. शेवटी त्यांना कोर्टात धाव घ्यावी लागली. या सर्वांमुळे अंधेरीत ऋतुजा लटके यांच्या बाजूने वातावरण निर्मिती झाली होती. भाजपाला माहिती होते की, इथे आपला पराभव होणार आहे. पराभवाची खात्री झाल्यानंतर भाजपाने निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"