Maharashtra Politics: अवघ्या देशभरात श्रीराम नवमी म्हणजेच रामजन्माचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. भाविक देशभरातील राम मंदिरात गर्दी करत असून, अनेकविध ठिकाणी शोभा यात्रा, प्रभात फेऱ्या काढण्यात आल्या. अयोध्येत तर मोठा उत्सव साजरा करण्यात आला. यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने निशाणा साधत टीका केली आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवानिमित्त आयोजित मनसेच्या पाडव्या मेळाव्यात हिंदू बांधवांनी रामनवमी जोरात साजरी करावी, असे आवाहन केले होते. तसेच एकदा राज्य माझ्या हातात द्या, मी सगळा महाराष्ट्र सुतासारखा सरळ करेन. कुणीही यावे आणि टपली मारून जावे, हे चालणार नाही. माझ्या तमाम हिंदू बांधवांना माझी विनंती आहे, यंदा रामनवमी जोरात साजरी करा. ६ जूनला शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. मी रायगडावर जाणार आहे. तुम्ही सगळ्यांनी दक्ष राहा, सावध राहा, असे राज ठाकरे म्हणाले होते. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे.
तथाकथित ‘हिंदूजननायक’ परदेश दौऱ्यावर पळाले
अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये रामनवमी साजरी करण्याचा आदेश देऊन स्वतः मात्र यामध्ये सहभागी नसणारे तथाकथित “हिंदूजननायक” परदेश दौऱ्यावर पळाले. त्यामुळे आता रामनवमी बिचाऱ्या कार्यकर्त्यांनाच साजरी करायची आहे. याला म्हणतात , हंस चुगेगा दाना तिनका, कौआ मोती खायेगा, असे अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"