मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याचा कारभार सुरू केला असला, तरी अद्यापही शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शिंदे गटावर टीकास्त्र सोडले जात आहे. शिंदे गटाच्या १६ आमदारांविरोधात अपात्रतेच्या नोटिसीनंतर यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र, ११ जुलैला होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. यानंतर आरोप-प्रत्यारोपांना धार चढली आहे. यातच राष्ट्रवादीने एक सल्ला दिला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी बंडखोरांचा गट भाजपत विलीन होणार नाही याची काळजी घ्या, असे म्हटले आहे.
शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड केली. शिंदे-फडणवीस सरकारने कामाला सुरुवात करताच महाविकास आघाडीच्या सरकारचे अनेक निर्णय स्थगित केल्याचे पाहायला मिळत आहे. नवीन सरकारच्या एकूणच कारभारावर अजित पवारांपासून सुप्रिया सुळेंपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडून टीका केली जात आहे. यातच आता अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केले असून, त्यात सावध राहण्याचा सल्ला वजा इशारा दिला आहे.
बंडखोरांचा गट भाजपत विलीन होणार नाही याची काळजी घ्या
साहेब बंडखोरांचा गट भाजपात विलीन होणार नाही याची काळजी घ्या. चिन्ह जवळपास तशीच दिसताहेत. एकदा का हा डाव भाजपानी साधला. तर मात्र मग आधुनिक मावळ्यांनी आजच्या औरंगजेबाला घाबरून त्याचे मांडलिकत्व स्विकारले असा नवा इतिहास पुढच्या पिढ्या लक्षात ठेवतील. अखंड सावध असा, असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे.
दरम्यान, यापूर्वीही अमोल मिटकरी यांनी ट्विट करत शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली होती. सद्यस्थिती महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे देवेंद्र फडणवीस दुसऱ्या, चंद्रकांत पाटील तिसऱ्या तर इतर भाजप नेते चौथ्या व पुढच्या नंबरवर फेकले गेलेत. विश्वास आहे शिंदेसाहेब भाजपची जनमानसातील उरली सुरली लोकप्रियता लवकरच संपवतील, असा खोचक टोला लगावला होता.