शीलेश शर्मा नवी दिल्ली : शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस रालोआत सामील होण्याच्या मुद्यावरून संभ्रमात आहे. संपूर्ण पटकथा लिहिण्यात आल्यानंतरही केवळ राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांमुळे रालोआत सामील होण्याच्या संदर्भात अद्याप पक्षाला कोणताही ठोस निर्णय घेता आलेला नाही, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेस आणि रालोआ यांच्यात समझोता व्हावा, यासाठी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल प्रयत्नशील आहेत. प्रफुल्ल पटेल यांनी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांची तीनदा भेट घेऊन या नव्या आघाडीची पार्श्वभूमी तयार केली. पटेल आणि अमित शाह यांच्यादरम्यानची पहिली भेट गुजरात राज्यसभा निवडणुकीच्या आधी म्हणजे २६ जुलै रोजी झाली.काँग्रेस नेते अहमद पटेल यांना पराभूत करण्यासाठी गुजरातमधील राकाँच्या दोन आमदारांनी भाजपाच्या बाजूने मतदान करण्याची योजना या बैठकीत ठरली होती, असे सूत्रांनी सांगितले.मोठे नुकसान होऊ शकते-सुप्रिया सुळे यांनीही अमित शाह यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. या भेटीगाठीनंतरही राकाँ आणि अमित शाह यांच्यादरम्यान समझोता होऊ शकला नाही. ‘ज्यांना अंतिम निर्णय घ्यावयाचा आहे, ते पक्षाध्यक्ष शरद पवार हे या नव्या ‘मैत्री’साठी सध्या तयार नाहीत,’ असे राकाँच्या एका वरिष्ठ नेत्याने स्पष्ट केले. या दिशेने पाऊल टाकले तर महाराष्टÑाच्या राजकारणात राकाँच्या अस्तित्वाला मोठे नुकसान होऊ शकते, अशी भीती शरद पवार यांना वाटत आहे. त्यासोबतच रालोआत सामील होण्याच्या मुद्यावरून राकाँतच मतभेद असल्याचे संकेत मिळाले आहेत.केंद्रीय मंत्रिमंडळात राष्टÑवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची संख्या किती राहील, यावरून अमित शाह आणि पटेल यांच्यात एकमत होऊ शकले नाही, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. असे असले तरी भाजपाला राजकीय फायदा मिळवून देण्यासाठी राष्टÑवादी काँग्रेसने गुजरातमध्ये काँग्रेसविरुद्ध आघाडी उघडलेली आहे. भाजपाच्या अधिक जवळ जाता यावे, हा त्यामागचा उद्देश आहे.पटेल आणि शाह यांच्या याच भेटीत राकाँ आणि रालोआ यांच्यात संभाव्य आघाडी तयार करण्याबाबतचा आराखडा तयार झाला. तथापि, राकाँ रालोआत सामील होणार असल्याच्या बातम्या झळकल्यावर मात्र पटेल आणि सुप्रिया सुळे यांनी ‘ही सर्व अटकळबाजी आहे’, असे सांगून या वृत्ताचे खंडन केले होते. परंतु पटेल यांनी शाह यांची भेट का घेतली, या प्रश्नावर राकाँ नेते मौन धारण करून आहेत.
राष्ट्रवादी आणि रालोआत नव्या ‘मैत्री’साठी चर्चा, भेटीगाठी सुरू ; पक्षांतर्गत मतभेदांमुळे तूर्तास निर्णय लांबला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2017 2:42 AM