अभिनव चौकात राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 06:45 PM2018-10-27T18:45:47+5:302018-10-27T18:47:21+5:30
सामनाच्या अग्रलेखात अजित पवारांवर वार केल्यामुळे नाराज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले. हे आंदोलन सुरु असतानाचं अचानक शिवसेनेचे कार्यकर्तेही चौकाच्या विरुद्ध बाजूला उभे राहिले.
पुणे : सामनाच्या अग्रलेखात अजित पवारांवर वार केल्यामुळे नाराज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले. हे आंदोलन सुरु असतानाचं अचानक शिवसेनेचे कार्यकर्तेही चौकाच्या विरुद्ध बाजूला उभे राहिले. मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवत कार्यकर्त्यांना रोखून धरल्याने पुढील अनर्थ टाळल्याचे दृश्य पुण्यात बघायला मिळाले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात राम मंदिर बांधण्याविषयीचा इरादा बोलून दाखवला. त्यावर पवार यांनी त्यांची खिल्ली उडवली होती. पवार यांच्या त्या विधानाला आज प्रसिद्ध झालेल्या सामनाच्या अग्रलेखातून उत्तर देण्यात आले. यावेळी वापरण्यात आलेल्या भाषेवर आक्षेप घेत पुण्यातील अभिनव चौकात असलेल्या सामनाच्या कार्यालयाजवळ राष्ट्रवादीने आंदोलन केले. या आंदोलनाच्या दरम्यान सामनाचा अंकही जाळण्यात आला. त्याचवेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही सामनाच्या कार्यालयाखाली समर्थनार्थ घोषणा दिल्या.
अजित पवारांविरोधातील अग्रलेखावरून राष्ट्रवादी आक्रमक, 'सामना'चे अंक जाळले
शिवसेना नगरसेवक विशाल धनवडे म्हणाले की,अजित पवारांनी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला होता. त्यांना त्याच पद्धतीचे उत्तर सामनामधून देण्यात आले. जो ज्या भाषेत बोलेल त्याच पद्धतीने उत्तर देण्याची शिवसेनेची स्टाईल आहे. यापुढेही ही स्टाईल कायम ठेवण्यात येईल.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे म्हणाले की, अत्यंत हीन दर्जाची भाषा सामनाच्या अग्रलेखात वापरण्यात आली आहे . ज्या पक्षाच्या प्रमुखांना कधी ग्रामपंचायतीची निवडणुकही लढवता आली नाही त्यांनी अशा पद्धतीने टीका करताना स्वतःची उंची बघायला हवी होती. अजित पवार काहीही चुकीचे बोललेले नाहीत, राज्यात दुष्काळ, बेकारीसारखे प्रश्न असताना त्यांनी राम मंदिराचा मुद्दा आणला आहे.