Anil Deshmukh News: अजित पवार यांच्यासह एक मोठा गट सत्तेत सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे दिसत आहेत. विकासासाठी म्हणून तिकडे गेलो असे काहीजण म्हणतात त्याला काही अर्थ नाही. ईडी लागली म्हणूनच ते तिकडे गेले. तिकडे गेलो नाही, तर दुसऱ्या जागी जावे लागेल, अशी भीती त्यांना होती, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार गटावर हल्लाबोल केला. यानंतर आता शरद पवार गटासोबत असलेल्या अनिल देशमुख यांनी भाजपवर गंभीर आरोप करताना, समझोता करण्यास नकार दिला आणि दुसऱ्याच दिवशी रेड पडली, असा दावा केला आहे.
महाविकास आघाडीच्या काळात गृहमंत्री असताना पदाचा गैरवापर करून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप अनिल देशमुखांवर आहे. १०० कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी अनिल देशमुखांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी अनिल देशमुख सुमारे वर्षभर तुरुंगात होते. मात्र, यासंदर्भात आता अनिल देशमुख यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
भाजपशी समझोता करण्यास नकार दिला, दुसऱ्या दिवशी रेड पडली
भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा समझोता करण्यासाठी दबाव होता. समझोता करण्यास नकार दिला, त्यामुळे परमवीर सिंग यांना माझ्यावर खोटे आरोप करायला लावले आणि माझ्यावर कारवाई करायला लावली, हे शंभर टक्के खरे आहे. ज्या पद्धतीने माझ्यावर दबाव होता, मी सरळ सांगितले की मी कोणत्याही पद्धतीने समझोता करणार नाही आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी माझ्यावर रेड पडली आणि माझ्यावर कारवाई करण्यात आली, ही वस्तुस्थिती आहे, असा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे.
दरम्यान, अनिल देशमुख १४ महिने आत होते. त्यांच्यावरही दबाव होता. आमच्यात या, नाही तर कारवाई होईल. त्यांनी मी काही केलेच नाही, तर का येऊ असे ठणकावून सांगितले. ज्यांना कारवाईची भीती वाटली ते गेले. आम्ही विकासाला पाठिंबा दिला, विचार नाही बदलले, असे ते आता सांगतात, मात्र त्याला काहीच अर्थ नाही. सत्तेचा चुकीचा वापर होत असेल, तर त्याला सोशल मीडिया लगाम घालू शकते. लोकशाहीचा आवाज दाबला जात असेल, तर त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.