NCP AP Group Dattatray Bharne News: विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश आणि बहुमत मिळाले असले तरी मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप आणि पालकमंत्रीपदावरून सारे काही आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. महायुतीमधील काही मंत्र्यांनी अद्यापपर्यंत मंत्रिपदाचा पदभार स्वीकारलेला नसल्याचे म्हटले जात आहे. यावरून हे मंत्री नाराज आहेत का, अशा चर्चाही रंगल्या आहेत. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ यांनी अजित पवारांविरोधात उघडपणे नाराजी बोलून दाखवली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी अजूनही मंत्रिपदाचा पदभार स्वीकारलेला नाही.
याबाबत प्रतिक्रिया देताना दत्तात्रय भरणे म्हणाले की, मी देशात नव्हतो. बाहेर परदेशात गेलो होतो. आता पुढच्या आठवड्यात मुंबईला जाणार आहे, मी नाराज नाही. मी १० वर्ष परदेशात गेलो नव्हतो. आता कुठे गेलो तर लगेच नाराजीच्या चर्चा रंगल्या. या नाराजीच्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. पुढील आठवड्यात पदभार स्वीकारणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात अतिशय चांगल्या प्रकारे राज्याला पुढे घेऊन जाण्याचे काम आम्ही करत आहोत, असा विश्वास दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हेच होतील
पुण्याच्या पालकमंत्री पदासंदर्भात काहीही रस्सीखेच नाही. सर्व तुमच्या मनासारखे होईल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत योग्य तो निर्णय घेतील. पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबत कोणी काहीही म्हणू द्या, पण या जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हेच होतील, असा मोठा दावा दत्तात्रय भरणे यांनी केला आहे. तसेच बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या प्रकरणात वाल्मीक कराडला अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे, वाल्मीक कराडचे मंत्री धनंजय मुंडेंसोबत असलेल्या संबंधावरुन त्यांचे मंत्रिपद काढून घेण्याची मागणी करण्यात येत आहे. अशातच मंत्री दत्तात्रय भरणे यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण करत त्यांचा या प्रकरणात संबंध नसल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या प्रकरणाचा तपास सुरु आहे. काल वाल्मीक कराड शरण आलेले आहेत. जो दोषी असेल त्याच्यावर १०० टक्के कारवाई केली जाईल. पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आमचे नेते आहेत. मित्र, कार्यकर्ता प्रत्येकाचा असतो. एखाद्या मित्राने किंवा कार्यकर्त्याने केले तर वरच्या नेत्याचा दोष असतो असं नाही. तपासामधून सगळं समोर येणार आहे. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो धनंजय मुंडे यांचा त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध नसावा, असे दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.