“अजित पवारांकडे अर्थमंत्रीपद नसेल, तर महायुती सरकारलाही ‘अर्थ’ राहणार नाही”: अमोल मिटकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 18:46 IST2024-12-12T18:45:22+5:302024-12-12T18:46:05+5:30
NCP AP Group Amol Mitkari News: अर्थमंत्रीपद अजित पवारांनाच शोभते. राज्याला आर्थिक शिस्त लावायची असेल, तर अजित पवारांकडे अर्थखाते द्यायला हवे, असे अमोल मिटकरी यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.

“अजित पवारांकडे अर्थमंत्रीपद नसेल, तर महायुती सरकारलाही ‘अर्थ’ राहणार नाही”: अमोल मिटकरी
NCP AP Group Amol Mitkari News: देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून नवनिर्वाचित आमदारांना शपथबद्ध करण्यात आले. यानंतर विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांनी बिनविरोध निवड करण्यात आली. परंतु, अद्यापही खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीचा निर्णय झालेला दिसत नाही. यावरून महाविकास आघाडीतील नेते टीका करत असतानाच अजित पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी मोठे विधान केले आहे.
दिल्लीत अजित पवारांनी सपत्नीक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांसह शरद पवारांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. शरद पवारांना वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या. यावर बोलताना, शरद पवार आणि अजित पवारांची भेट ही पूर्णत: कौटुंबिक होती. त्याचे कोणतेही राजकीय अन्ववयार्थ काढू नये, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
अजित पवारांकडे अर्थमंत्रीपद नसेल, तर मग या सरकारलाही ‘अर्थ’ राहणार नाही
संपूर्ण महाराष्ट्राने २०२४ च्या निवडणुकीपूर्वी पाहिले की, ज्या योजना महाराष्ट्रात आल्या, त्यात लाडकी बहीणपासून ते शेतकऱ्यांच्या वीजबिल माफीपर्यंतच्या अनेक योजना राबवण्यात आल्या. राज्यावर आर्थिक बोजा पडणार नाही, आर्थिक शिस्त लागेल, यासाठी सर्व प्रयत्न तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी केले. राज्याला आर्थिक शिस्त लावायची असेल, तर अजित पवार यांच्याकडेच अर्थ खाते असले पाहिजे. महायुतीमध्ये अर्थमंत्री म्हणून अजितदादा हेच शोभतात. अर्थमंत्री खात्यासाठी वाटाघाटी होत असतील आणि जर आम्हाला समजले की भाजपाकडेच गृह आणि अर्थ खाते राहत असेल, तर गृह खाते भाजपाला शोभते, ते त्यांनी ठेवावे आणि अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसला शोभते. त्यामुळे अजित पवारांकडेच अर्थमंत्रीपद असावे, अशी आमची इच्छा आहे. अन्यथा त्या महायुतीला काही अर्थ आहे, असे मला वाटत नाही, असे अमोल मिटकरी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
दरम्यान, परभणीतील या प्रकरणानंतर फक्त दलित समाज, आंबेडकरी जनता रस्त्यावर आली. इतर समाजालाही हक्क बाबासाहेबांच्या घटनेने दिले आहेत. मग इतर समाज शांत का?, त्यांनी लोकशाही मार्गाने निषेध का नोंदवला नाही? अशी विचारणा मिटकरी यांनी केली.