Sunil Tatkare News: पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विज्ञान भवनात थाटात उद्घाटन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष शरद पवार, मावळते अध्यक्ष रवींद्र शोभणे, महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे, उज्ज्वला मेहेंदळे, संजय नहार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकत्र आले होते. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली असली तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी आनंद व्यक्त केला आहे.
या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी शरद पवार यांच्यासाठी खुर्ची पुढे केली. स्वहस्ते शरद पवार यांच्यासाठी ग्लासात पाणी भरून दिले. पंतप्रधान मोदी यांच्या या कृतीचे कौतुक होत आहे. तसेच यासंदर्भातील व्हिडिओ व्हायरलही होत आहे. शरद पवार हे पंतप्रधान मोदी यांच्या शेजारी बसल्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी खोचक शब्दांत टीका केली. तर सुनील तटकरे यांनी आनंद व्यक्त केला.
PM मोदी-शरद पवारांमधील संवाद पाहून सुखावलो
पत्रकारांशी बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, या देशाची या राज्याचे एक संस्कृती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात झालेला संवाद हा आम्हाला भावणार आहे. पंतप्रधानांनी आदर व्यक्त केला, त्याबाबत त्यांचे आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांचे संबंध पूर्वीचे आहेत. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बारामतीला निमंत्रित केले होते. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाला निमंत्रित केले होते. काल सर्वकाही बघून आम्ही सुखावलो आहोत, असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आहेत. खरे म्हणजे मला असे वाटले होते की, मोदी त्यांच्या बाजूला बसणार नाहीत. भटकती आत्माच्या बाजूला पंतप्रधान कसे काय बसतील? त्यांना पंतप्रधान कार्यालयाने त्यांना कसे काय बसू दिले? भटकती आत्मा आहे ना? भटकती आत्माच्या बाजूला पंतप्रधान कसे बसले? असे सवाल करत संजय राऊत यांनी टीका केली.