"राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच, हे निवडणूक आयोगानेही दाखवलं"; आव्हाड असं नेमकं का म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 08:32 PM2024-02-07T20:32:05+5:302024-02-07T20:38:39+5:30

शरद पवार समर्थक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देत आता निवडणूक आयोगानेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचाच असल्याचं दाखवून दिलं असल्याचं म्हटलं आहे.

ncp belong to Sharad Pawar election commission also showed this says mla jitendra awhad | "राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच, हे निवडणूक आयोगानेही दाखवलं"; आव्हाड असं नेमकं का म्हणाले?

"राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच, हे निवडणूक आयोगानेही दाखवलं"; आव्हाड असं नेमकं का म्हणाले?

Jitendra Awhad ( Marathi News ) : अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल काल निवडणूक आयोगाने दिल्यानंतर आज शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला नवीन नाव देण्यात आलं आहे. पवार गटाने सुचवलेल्या तीन नावांपैकी एका नावावर शिक्कामोर्तब करत निवडणूक आयोगाने त्यांच्या पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार हे नाव वापरण्यास परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार समर्थक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देत आता निवडणूक आयोगानेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचाच असल्याचं दाखवून दिलं असल्याचं म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी लिहिलेल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "अखेर सत्य समोर आलेच. निवडणूक आयोगानेही नाव देताना कळत- न कळत हे दाखवून दिले की, एनसीपी ही शरद पवार साहेबांचीच आहे. म्हणून आम्हाला नाव मिळालं, 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार'. हेच खरे जन्मदाते होते पक्षाचे. पण, काही पाकीटमारांनी घड्याळ चोरलं. पण, त्यांच्या दुर्दैवाने मनगट आमच्याकडेच राहिले. लढाईत नेहमी मनगटच कामी येत असतं. शरद पवार आमचे मनगट अन् त्यात असलेला जोर पुन्हा एकदा महाराष्ट्रात जादू करेल. आता त्यांनी नाव घ्यावे, एनसीपी - अलिबाबा आणि चाळीस चोर," असा टोलाही आव्हाड यांनी लगावला आहे.

जयंत पाटील यांच्याकडून कार्यकर्त्यांना दिलासा

शरद पवारांच्या पक्षाला नवीन नावासह आणि चिन्हासह निवडणुकीला सामोरं जावं लागणार असल्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिलासा देत म्हटलं आहे की, "जनता जाणती आहे, फक्त चिन्हावरून नाही तर नाव आणि व्यक्तीच्या कार्यावरून पक्ष ओळखते म्हणूनच चिन्हाची भीती बाळगू नका," असा दिलासा जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांना दिला.

दरम्यान, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे पवार साहेब आणि पवार साहेब म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे गेल्या तीन दशकांपासून जनतेच्या मनावर कोरले गेलेलं समीकरण आहे. 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार' या नावामागे असलेला पुरोगामी विचार महाराष्ट्रातील घराघरात रुजवण्यासाठी नव्या जोमाने संघर्ष करू, पुन्हा लढू आणि पुन्हा जिंकू," असं खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

Web Title: ncp belong to Sharad Pawar election commission also showed this says mla jitendra awhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.