मुंबई - महाराष्ट्रात ३ वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीची निर्मिती करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावली. ज्यात राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना आणि काँग्रेसही सहभागी झाली. मात्र आता ही आघाडी पोकळ झालीय का? असा प्रश्न उपस्थित राहत आहे. महाविकास आघाडी तुटणार अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याला कारण म्हणजे अलीकडच्या काळात शरद पवार यांनी अदानी, पीएम मोदी डिग्री यासारख्या विविध मुद्द्यांवर स्वतंत्र मत व्यक्त केले.
आता शरद पवार यांच्या NCP नं बाजार समिती निवडणुकांमध्ये जवळपास ५० टक्क्यांहून अधिक ठिकाणी सत्ताधारी भाजपासोबत हातमिळवणी केलीय असा दावा करण्यात येत आहे. महाविकास आघाडीतील मतभेदात EVM मुद्दाही समोर आला आहे. उद्धव ठाकरे गटासोबत विरोधकांनी EVM वर संशय व्यक्त केलेला असताना दुसरीकडे पवारांच्या राष्ट्रवादीकडून EVM वर वेगळेच मत मांडले आहे. टाईम्स ऑफ इंडियानं याबाबत वृत्त प्रसारित केले आहे.
काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी वीर सावरकर यांच्या मुद्द्यावर काँग्रेसशी असहमती दर्शवली. त्यानंतर काँग्रेससह विरोधकांनी अदानी प्रकरणात जेपीसी चौकशीची मागणी केली. त्यावरही पवारांनी वेगळी भूमिका मांडत जेपीसी चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही. याचा तपास सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या समितीकडून करण्यात यावा असं म्हटलं. शरद पवारांची गेल्या ३-४ दिवसांतील विधाने पाहता महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
शेतकऱ्यांची फसवणूक नको १९६३ मध्ये एपीएमसी अंतर्गत बाजार समितीची स्थापना करण्यात आली होती. शेतकऱ्यांना त्याच्या उत्पादनाचे योग्य मूल्य मिळावे. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी बाजार समिती गठीत करण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या मालाची विक्री करण्याचं व्यासपीठ असलेल्या एपीएमसीच्या निवडणुका राज्यात सुरू झाल्या आहेत.
काँग्रेसनं व्यक्त केली नाराजीकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राष्ट्रवादीनं बाजार समिती निवडणुकीत ५० टक्क्याहून अधिक ठिकाणी आमचा विरोधी पक्ष भाजपाशी हातमिळवणी केली आहे अशी माहिती मलाही मिळाली आहे. बूथवरील कार्यकर्त्यांकडून आलेली ही माहिती तपासून पाहिली जाईल. हा मुद्दा ठाण्यात होणाऱ्या कार्यकारणी समितीच्या बैठकीसमोर मांडला जाईल असं त्यांनी सांगितले.