ठाकरेंकडील खासदारांच्या जागा देखील राष्ट्रवादी लढवू शकते; अजित पवारांच्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 20:47 IST2023-12-01T20:46:35+5:302023-12-01T20:47:09+5:30
उद्धव ठाकरेंकडील खासदारांच्या जागाही लढवू शकतो, असे वक्तव्य केल्याने महायुतीत पुन्हा एकदा जागावाटपावरून अस्वस्थता दिसू लागली आहे.

ठाकरेंकडील खासदारांच्या जागा देखील राष्ट्रवादी लढवू शकते; अजित पवारांच्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया
अजित पवारांनी आपण आपल्या खासदारांच्या चार जागा लढविणारच परंतू उद्धव ठाकरेंकडील खासदारांच्या जागाही लढवू शकतो, असे वक्तव्य केल्याने महायुतीत पुन्हा एकदा जागावाटपावरून अस्वस्थता दिसू लागली आहे. या वक्तव्यावर शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी अमित शहांनी १३ चा शब्द दिला असल्याचे वक्तव्य केले आहे. आता अजित पवारांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सावध प्रतिक्रिया आली आहे.
अजित पवारांनी आज कर्जतमधील पक्षाच्या निर्धार कार्यक्रमात बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या चार जिंकलेल्या लोकसभेच्या जागा लढविणार असल्याचे म्हटले आहे. याचबरोबर इतर जागांमध्ये ज्या सध्या उद्धव ठाकरेंकडील खासदारांकडे आहेत, त्या ठिकाणी राष्ट्रवादीची ताकद असेल तर भाजप आणि शिंदेंसोबत चर्चा करून आपल्याला वाटप करता येईल असे म्हटले होते. यामुळे शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे.
एकनाथ शिंदे हे नागपुरात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबतच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. परंतू त्यांना नागपूरला येण्यास खूप उशीर झाला होता. यावेळी पत्रकारांनी शिंदे यांना अजित पवारांच्या जागा वाटपाच्या दाव्यावरून छेडले असता शिंदेंनी थेट प्रतिक्रिया देण्याचे टाळले.
येत्या लोकसभा आणि विधानसभा आम्ही महायुतीचे तिन्ही घटक पक्ष म्हणून लढविणार आहोत. लोकसभेला राज्यातून ४५ जागा जिंकून द्यायच्या आहेत. एकत्र लढविणार असल्याने अजित पवारांनी तसे वक्तव्य केले आहे, असे शिंदे म्हणाले.