मुंबई - विधानसभा निवडणुकीला जेमतेम दीड-दोन महिन्यांचा कालवधी उरला असताना सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. जळगाव जिल्ह्यात मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसलाएरंडोल एकमेव मतदारसंघात विजय मिळवता आला होता. जळगाव जिल्ह्यातील भाजपची आणि शिवसेनेची ताकद वाढत आहे. त्यामुळे एरंडोल मतदारसंघात पुन्हा विजय मिळवणे राष्ट्रवादीपुढे मोठे आव्हान ठरणार आहे.
युतीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या जळगाव जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी आपली ताकद वाढवली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील संख्याबळ ५ वरून १ वर आले होते. एकमेव एरंडोल मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश पाटील हे अतिशय कमी मतांच्या फरकाने निवडून आले होते. त्यामुळे आहे ती जागा टिकविण्याचे आव्हान राष्ट्रवादीसमोर आहे.
एरंडोल मतदारसंघात १९६२ नंतर काँग्रेसला ५ वेळा तर शिवसेनेला ४ वेळा विजया मिळवता आला आहे. इतर २ तर राष्ट्रवादीला २०१४ मध्ये पहिल्यांदा या ठिकाणी विजय मिळवता आला होता. त्यावेळी शिवसेनेचे माजी आमदार चिमणराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांच्यात मुख्य लढत झाली होती. तर आमदार सतीश पाटील अवघे १ हजार ९८३ मतांनी निवडून आले होते. विशेष म्हणजे २०१४ मध्ये भाजप- शिवसेना वेगवेगळे लढले होते.
जळगाव जिल्ह्यात युती भक्कम मानली जाते, १९९९ ते २००९ पर्यंत एरंडोल मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात होता. २०१४ मध्ये सुद्धा सेनेचे उमदेवार चिमणराव पाटील यांना अतिशय कमी मतांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. मतदारसंघात राष्ट्रवादीमध्ये झालेली गटबाजी आणि युतीची वाढती ताकद यामुळे, एरंडोल मतदारसंघात पुन्हा विजय मिळवणे राष्ट्रवादीपुढे मोठे आव्हान ठरणार आहे.