Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सत्ता स्थापन केल्यानंतर तब्बल ३८ दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार केला. यानंतर काही दिवसांनी खातेवाटप जाहीर झाले. यानंतर सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना फोन उचलल्यावर वंदे मातरम् म्हणण्याचे आदेश जारी केले आहेत. यावरून आता महाविकास आघाडीतील नेत्यांनी नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी वंदे मातरम् म्हणणार नसल्याचे स्पष्ट करत सरकारी निर्णयावर खोचक शब्दांत टीका केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला तर ते जय महाराष्ट्र बोलतात, मी वंदे मातरम् म्हणणार नाही, मी जय महाराष्ट्र म्हणेन, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. मंत्री झाल्यावर आदेश काढला, या निर्णयात वाईट वाटण्यासारखे काही नाही. काही जण 'जय हिंद' बोलतात, काही 'जय महाराष्ट्र' बोलतात, आमचे पोलीस बांधव फोन केल्यावर जय हिंद म्हणतात, शिवसेनेचे लोक जय महाराष्ट्र म्हणतात, असे छगन भुजबळ यांनी संगितले.
शिंदेंनी मुनगंटीवारांना विचारावं फोन केल्यावर काय म्हणायचं?
आता शिंदेंनी मुनगंटीवारांना विचारावे, की फोन केल्यावर काय म्हणायचे? आपण ज्या ऑर्डर काढतो त्याचे भान ठेवायला हवे. मी वंदे मातरम् म्हणणार नाही, मी जय महाराष्ट्र म्हणेन. कायद्याने असे कुणावर बंधन घालणे योग्य नाही. लोकांच्या आवडी निवडीनुसार ते बोलतात, असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, गिरीश महाजन यांना जिल्ह्याचे प्रश्न माहीत आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना काय सल्ला देणार. देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत, त्याचा फायदा नाशिकला करून घ्यावा, असा सल्ला भुजबळांनी दिला.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेल्या भाषणात सगळ्यांना बरोबर घ्या हे बोलले त्याचे स्वागत करतो, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घ्यायला हवे. मात्र त्यांच लोकांनी त्याची अंमलबजावणी करावी. गांधी घराण्याबद्दल बोलत असतील, तर राजीव गांधी यांचे बलिदान विसरता येणार नाही. जे मंत्री नेते दिसत आहेत, त्यांना घराणेशाहीचा इतिहास आहे. यांच्या सरकारमध्ये घराणेशाही आहे त्यांनी बघावी, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.