Maharashtra Politics: शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखावरून ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच आता महाविकास आघाडी कधीपर्यंत टिकेल, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. राजकीय वर्तुळातील घडामोडींवर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या एका विधानानंतर कार्याध्यक्ष पदाबाबत चर्चा सुरू आहे. याबाबत बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, मी असे काही ऐकले नाही, कार्याध्यक्ष असे काही पद निर्माण होईल का, इथून मुद्दा आहे. आणि निर्माण करणार असतील, तर काय पद्धत असेल, हा दुसरा मुद्दा आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये अर्धा डझन लोक तरी असे आहे, की ते कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळू शकतात, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडी कधीपर्यंत टिकेल?
जोपर्यंत काँग्रेसचे सोनिया गांधी, राहुल गांधी, शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार हे जोपर्यंत एकत्र आहे. तोपर्यंत बाकीचे कुणी काहीही बोलले तरी मला असे वाटते की, तिकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही. आपल्या नेत्यांनी जे ठरवले आहे, त्यानुसार खालच्या लोकांना काम करायचे आहे. त्यामुळे मिठाचे खडे टाकू नये, असे छगन भुजबळ म्हणाले.
दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण राहिलेले आहे. पंधरा वर्ष राज्य करत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेसचे सरकार त्यांच्या काळात गेले. मला असे वाटते की, या सगळ्यांनी आपल्या अंतर्मनात शोध घेतला पाहिजे की, हे असे कसे झाले? तीन वेगवेगळ्या विचारधारेचे लोक एकत्र आल्यानंतर थोडे घर्षण होते. नेत्यांनी जर असे काही म्हटले, तर एकजुटीत विस्कळीतपणा निर्माण होईल. ते होता कामा नये, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.