Maharashtra Politics: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांकडून अनेकविध प्रकारचे दावे केले जात आहेत. आरोप-प्रत्यारोपही होताना दिसत आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने महाविकास आघाडीचे जागा वाटप कसे होणार, याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत प्रतिक्रिया दिली. बाकी काही असले तरी एक सूत्र निश्चित असेल ते म्हणजे कोणत्या पक्षातील कोणती व्यक्ती त्या ठिकाणी निवडून येणार आहे, या निकष प्राधान्याने वापरला गेला पाहिजे. किंबहुना तो वापरला जाईल, असे छगन भुजबळ यांनी ठामपणे सांगितले.
महाविकास आघाडीत जागा वाटप कसे होणार?
महाविकास आघाडीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, जागावाटपाबाबत कोणते निकष लावायला हवेत किंवा काय करायला पाहिजे, यावर कुठेही एकमत झालेले नाही. पण चर्चा झालेल्या आहेत. मात्र, याबाबत मीडियात अधिक चर्चा आहे. अमूक पक्षाला एवढ्या जागा, तमूक पक्षाला एवढ्या जागा, अशा चर्चा एन्जॉय करतो, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. महाविकास आघाडीतील आमच्या तीन पक्षांकडून प्रत्येक पक्षातील दोन-तीन नेते निवडले जातील. ते लोक एकत्र बसून चर्चा करतील. कोणते निकष लावायचे, कोणत्या पक्षाला किती जागा दिल्या जातील, याबाबत निर्णय घेतील, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.