नाशिक: पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणी १ हजार ३४ कोटी रुपयांच्या झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच अडचणीत आहेत. अनेक तासांच्या चौकशीनंतर अखेर ईडीने संजय राऊत यांना अटक केली. न्यायलयाने राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. आता संजय राऊतांच्या कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया देत खोचक टोला लगावला आहे.
एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडीतच होते पण आता प्रभाग रचना का बदलली सांगता येणार नाही. जे उमेदवार असतात त्यांना वॉर्ड बदलला तर त्रास होतोच, असे सांगत, राज्यपालांकडे आम्ही मागणी केली की पूरग्रस्तांना, शेतकऱ्याना मदत करा. ९२ नगरपालिका, ४ नगरपंचायतमध्ये ओबीसी आरक्षण लागू नाही. बांठीया कमिशनन ओबीसीची संख्या कमी दाखवली. अनेक त्रुटी आहेत त्यासाठी तुम्ही लक्ष घालावे, अशी मागणी राज्यपालांकडे केली असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली. ...तर आमच्या शुभेच्छाच
छगन भुजबळ यांना संजय राऊत यांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, ईडीच्या कायद्यात लवकर जामीन मिळत नाही. पण काही मार्ग निघाला तर आमच्या शुभेच्छाच, अशी मिश्किल टिपण्णी भुजबळ यांनी केली. तसेच छगन भुजबळ यांना संजय राऊतांवर शरद पवार गप्प का, अशी विचारणाही करण्यात आली. यावर बोलताना, असे काही नाही. लोकसभेत पण ईडीच्या कारवायांसंदर्भात राष्ट्रवादीकडून आवाज उठवला जातो. खासदार सुप्रिया सुळे सातत्याने भूमिका मांडत असतात. अनेक विरोधी पक्षांनी हा कायदा राक्षसी असल्याचे म्हटले आहे. हा कायदा युपीएच्या काँग्रेसच्या काळातच बनवला गेला आहे. चिदंबरम यांनीच बनवलाय त्यामुळे भाजपला तरी काय ठेवणार? असे भुजबळ म्हणाले.
थोडा पॉझ घ्यावा लागतोच, दोनच मंत्री आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली असून, त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, रात्री २ पर्यंत जागतात, प्रवास करतात. आपल्याला पण देह आहे त्याची परिसीमा आहे. थोडा पॉझ घ्यावा लागतोच. दोनच मंत्री आहे, असा टोला लगावत, ५ तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल का, याबाबत माहीत नाही. अनेक याचिकांची गुंतागुंत सुप्रीम कोर्टात चालू आहे ती कशी सुटते ते बघू, असेही ते म्हणाले.
दरम्यान, विशेष पीएमएलए न्यायालयात सुनावणी सुरू असताना, संजय राऊत यांनी ईडी कोठडीवर काही आरोपही केले आहेत. मला ह्रदयविकाराचा त्रास असूनही मला जिथे ठेवलेय तिथे व्हेंटिलेशन नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यावर, राऊत यांना एसी रुममध्ये ठेवलेय, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले. संजय राऊत यांच्यावर सगळे आरोप जुनेच आहेत, यात नवीन काहीही नाही. तसेच, त्यांच्यावरील आरोप आणि ही कारवाई राजकीय हेतुने करण्यात आल्याचेही राऊतांचे वकील मनोज मोहिते यांनी न्यायालयात म्हटले आहे.