Manoj Jarange Patil ( Marathi News ) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले आहे. भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी न दिल्याने त्यांचे समर्थक महायुतीविरोधात रोष व्यक्त करत असताना भुजबळांचे विरोधक आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना आपली भूमिका मांडली आहे. "भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं नाही, हा प्रश्न आमचा नाही. त्यांना मंत्रिमंडळात घेतलं नाही, हा त्यांचा राजकीय प्रश्न आहे. मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्याशी आमचा काहीच संबंध नाही. ओबीसीतीलही गोरगरिबांना त्यांनी काही खाऊ दिलेलं नाही. आम्हाला त्या राजकीय विषयात पडायचं नाही," असं जरांगे यांनी म्हटलं आहे
छगन भुजबळांवर निशाणा साधत असताना मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा केली आहे. "मराठा आरक्षणासाठी आम्ही पुन्हा आंदोलन उभं करणार आहोत. त्याची तारीख उद्या जाहीर केली जाईल. जाहीर केलेल्या तारखेला संपूर्ण राज्यातून पुन्हा एकदा मराठे अंतरवाली सराटी इथं येतील आणि मराठ्यांची ताकद देशाला दिसेल," असा दावा जरांगे पाटलांनी केला आहे.
छगन भुजबळांनी काय म्हटलंय?
मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्याबाबत पक्षाने घेतलेल्या अनपेक्षित निर्णयावर नाराजी व्यक्त करताना छगन भुजबळ म्हणाले की, "मी सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावललं काय आणि फेकलं काय, फरक काय पडतोय? मंत्रिपद किती वेळा आले आणि गेले. छगन भुजबळ संपला नाही. ज्यांनी डावललं त्यांना विचारायला हवं. अजित पवारांशी बोलण्याची गरज वाटली नाही. माझ्या मतदारसंघातील लोक आणि समता परिषदेचे कार्यकर्ते यांच्याशी मी बोलणार आहे. मनोज जरांगे पाटील यांना अंगावर घेतल्याचं बक्षीस मिळालं," अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
भुजबळांना का डावलले?
छगन भुजबळ यांना मंत्री मंडळातून का डावलले याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवण्यात येत आहे. मराठा समाजाचे आंदोलनाची धग कमी करण्यासाठी त्यांना डावलले असावे, असे एक सांगितले जाते.