Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange Patil: राज्यात एकीकडे अनेक घडामोडी घडत असताना दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे. ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यातच आता छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांना खोचक टोला लगावला असून, जरांगे पाटील स्वतःला काय समजतात, अशी विचारणा केली आहे.
मीडियाशी बोलताना मनोज जरांगे पाटील नाशिक दौऱ्यावर असून, १० फेब्रुवारीपासून पुन्हा अमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिल्याबाबत छगन भुजबळ यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, जरांगे पाटील स्वतःला काय समजतात आणि काय नाही. प्रत्येक वेळेस फक्त अल्टिमेटम देत असतात. इथे लोकशाही आहे की हुकुमशाही चाललेली आहे. लोक काम करत आहेत. माझ्या राजीनाम्याबाबत मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाऊन विचारावे, असे भुजबळ यांनी सांगितले.
मनोज जरांगे पाटील, हिंमत असेल तर मंडल आयोग संपवून दाखवावा
मंडल आयोगाबाबत याचिका दाखल करण्याच्यासंदर्भात एका प्रश्नावर बोलताना छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केला. मनोज जरांगे तुम्ही खरेच पाटील असाल मंडल आयोगाविरोधात जाऊन दाखवाच. मंडल आयोग संपवून दाखवावा. एवढी तरी अक्कल हवी की, एकीकडे ओबीसीतून आरक्षण हवे असे म्हणता आणि ओबीसी आरक्षणाचा निर्माता मंडल आहे, हेही माहिती नाही का? मंडल आयोग संपला तरी ओबीसी आरक्षणच राहणार नाही, एवढीही अक्कल आणि समज नाही, त्यांच्याशी काय बोलायचे, या शब्दांत छगन भुजबळ यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, खोट्या दाखल्यांवर कुणबी लिहिले जात आहेत. ते कुणबी झाले तर ते ओबीसी बनतील. त्यामुळे, आम्ही काय म्हणतोय त्यांना वेगळे आरक्षण द्या. पण हे मागच्या दाराने येत आहेत, असे भुजबळ म्हणाले.