मोदींचा दाखला देत अजित पवारांनी आरोग्याबाबत लोकांना केलं आवाहन; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 17:42 IST2025-01-20T17:40:53+5:302025-01-20T17:42:24+5:30
सर्वांनी व्यसनापासून दूर राहावे असं आवाहन देखील अजित पवार यांनी यावेळी केले.

मोदींचा दाखला देत अजित पवारांनी आरोग्याबाबत लोकांना केलं आवाहन; म्हणाले...
NCP Ajit Pawar : आज प्रत्येक व्यक्तीला आपल्या दैनंदिन आयुष्यात प्रचंड धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचं मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. याबाबत अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या आरोग्याची कशाप्रकारे घेतात याचे देखील यावेळी उदाहरण दिले. जालन्यातील स्थानिक रुग्णालयाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, एखादी व्यक्ती जर शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या फिट असेल तरच त्या व्यक्तीला निरोगी म्हटले जाते. सद्या वाढत असलेल्या विविध आजार, बदलती जीवनशैली यामुळे कोणत्याही वयोगटातील लोकांना कोणतेही आजाराला सामोरे जावे लागत आहे. तसेच सर्वांनी व्यसनापासून दूर राहावे असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
"आरोग्याच्या सुविधा देणाऱ्या या वास्तुमुळे जालना शहराच्या वैभवात भर पडली आहे. नागरिकांना विविध आजारांच्या अत्याधुनिक आरोग्य सुविधा एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने अलीकडे अनेक तज्ज्ञ डॉक्टर हे एकत्र येऊन हॉस्पिटल सुरू करुन आरोग्य सेवा देत आहेत. राज्य शासन सर्वांसाठी आरोग्य मिशन घेऊन पुढे जात आहे. या माध्यमातूनच राज्य शासनाने देखील बहुतेक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले आहेत. यामुळे नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहेत," अशी माहितीही अजित पवार यांनी दिली.
दरम्यान, यावेळी खासदार कल्याण काळे, आमदार अर्जून खोतकर, विक्रम काळे, सत्यजीत तांबे, मनोज कायंदे, डॉ. राजीव डोईफोडे, माजी आमदार राजेश टोपे आदींची प्रमुख उपस्थिती होती.