Maharashtra Politics: महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले. या अधिवेशनात अनेकविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. विधिमंडळाच्या पायऱ्यांवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलेच सुनावले आहे. राज्यात सत्तेचा गैरवापर सुरू आहे. लोकप्रतिनिधींना डाऊन करण्यासाठीच सरकार काम करत आहे, अशी घणाघाती टीका शरद पवार यांनी केली.
काही दिवसांपूर्वी राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख प्रदीर्घ कालावधीनंतर जामिनावर सुटले. यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. सत्तेचा गैरवापर होतोय. संजय राऊत आणि अनिल देशमुखांबाबत न्यायालयाने निर्णय घेतला. काही सदस्य आतमध्ये आहे. त्यांनाही न्याय मिळेल. जामीन हा हक्क आहे. ज्या कारणाने या लोकांना आत टाकले त्यात फारसे काही दिसत नाही, हा निष्कर्ष न्याय देवतेने काढला आहे. त्यामुळे सत्तेचा गैरवापर करून गेल्या काही महिन्यांपासून लोकप्रतिनिधींना डाऊन करण्याचे काम करण्यात आल्याचे स्पष्ट दिसते, या शब्दांत शरद पवार यांनी शिंदे-भाजप सरकारवर निशाणा साधला.
सत्ताधाऱ्यांनी काहीतरी शिकले पाहिजे
न्यायालयाच्या निर्णयांवरून सरकारचा दृष्टीकोन चुकीचा आहे, हे दिसून आले आहे. त्यातून सत्ताधाऱ्यांनी काही तरी शिकले पाहिजे, असा टोला शरद पवारांनी लगावला. तसेच ०१ फेब्रुवारीला केंद्राचे बजेट सादर होणार आहे. ते महत्त्वाचे आहे. त्यातून सरकारची नीती काय? हे दिसून येईल. या महत्त्वाच्या कालावधीत देशाचा विचार करून सरकारने पावले टाकली पाहिजेत, अशी अपेक्षा शरद पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
दरम्यान, मागच्या वर्षभरात काही प्रश्न काही चांगल्या गोष्टी घडल्या. जे प्रश्न होते त्याला पर्याय शोधून सामना करण्याची आवश्यकता होती ती केली. आता आपण यातून मुक्त झालो. आता २०२३ वर्ष सुरु होईल. ५६ ते ६० टक्के लोक शेती करत आहेत. पाऊस चांगला झाला तर येणारे वर्ष चांगले जाईल. शेती चांगली झाली तर क्रयशक्ती वाढते. क्रयशक्ती वाढणे हे व्यापार उद्योगाला चांगले दिवस आणते. बळीराजा यशस्वी झाला तर संबंध देशातील अन्य घटकांचेही दिवस चांगले येतात. सुदैवाने मागील वर्ष ठीक गेले.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारत महत्त्वाचा निर्यातदार होऊ शकतो. उद्योग आणि व्यापार क्षेत्रात सुधारणा व्हायला हव्यात. सत्तेत कोणीही असले तरी एकत्रित राहून अर्थकारण सुधारावे लागेल. अर्थकारण हे आव्हान आहे. येत्या वर्षात त्याला सामोरे जाऊया. नव्या उमेदीने नव्या उत्साहाने नव्या वर्षाचे स्वागत करूयात, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"