Girish Bapat Sad Demise: पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे पुण्यात दुखःद निधन झाले. ते महाराष्ट्रातील भाजपच्या जेष्ठ नेत्यांपैकी एक होते. गिरीश बापट यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात शोक व्यक्त करण्यात येत आहे. सर्वपक्षीय नेते गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश बापट यांच्या निधानावर अतीव दुःख व्यक्त केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असल्याचे म्हणत श्रद्धांजली वाहिली.
पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत गिरीश बापट यांनी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेत राजकीय प्रवास केला. पुण्यातील लोकांच्या मनात पक्के स्थान निर्माण करत त्यांनी पुणेकरांच्या व कामगारांच्या प्रश्नांसाठी नेहमीच काम केले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एक सर्वपक्षीय जनसंपर्क जोपासणारे राजकीय नेते आपण गमावले आहेत. गिरीश बापट यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांमध्ये शरद पवार यांनी ट्वीट करून त्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली आहे.
मनमिळाऊ स्वभावाचे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही गिरीश बापट यांच्या निधानावर शोक व्यक्त केला. माझे लोकसभेतील सहकारी आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले.ही बातमी अतिशय दुःखद आहे. सलग पाच वेळा पुण्यातून ते आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले.त्यांना काही काळ राज्य मंत्रिमंडळातही काम करण्याची संधी लाभली होती. त्यांच्या निधनामुळे एक मनमिळाऊ स्वभावाचे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. भावपूर्ण श्रद्धांजली, असे सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
पुणे जिल्ह्याचे सर्वसमावेशक नेतृत्व हरपले
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहिली. गिरीश बापट यांची प्रकृती काही महिन्यांपासून ठिक नव्हती. आजाराशी ते निर्धारने लढत होते. बरे होऊन सार्वजनिक जीवनात ते पुन्हा सक्रीय होतील, हा विश्वास आम्हा सगळ्यांना होता. तो विश्वास खोटा ठरला. गिरीशभाऊंच्या निधनाने पुणे जिल्ह्याचे सर्वसमावेशक नेतृत्व हरपले आहे. आम्ही ज्येष्ठ सहकारी, सुहृदय मित्र गमावला आहे. पुणे जिल्ह्याला, राज्याला गिरीशभाऊंची उणीव कायम जाणवेल, त्यांची आठवण कायम येत राहील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. गिरीशभाऊंच्या कुटुंबियांच्या, कार्यकर्त्यांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो, अशा शब्दात अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"