Maharashtra Politics: एकीकडे पुढील १५ दिवसांत सरकार कोसळणार असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यातच आता दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुंबईत भेट झाल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हाय. बी. चव्हाण सेंटर येथे शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट झाल्याचे म्हटले जात आहे. राज्याच्या राजकारणात लवकरच मोठे राजकीय भूकंप होणार असे वक्तव्य अलीकडेच प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. त्यानंतर आता शरद पवारांसोबत झालेल्या भेटीनंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आंबेडकर आणि पवार यांची भेट झाल्याने आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश होणार का असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
‘वंचित’ महाविकास आघाडीत येणार?
वंचित बहुजन आघाडीचा जर मविआमध्ये समावेश झाला तर मात्र त्याचा सकारात्मक परिणाम महाविकास आघाडीला होणार आहे, असे म्हटले जात आहे. काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबडेकर आणि उद्धव ठाकरे यांचीही भेट झाली होती. त्यावेळीही शिवसेना आणि वंचित अशा युतीची शक्यता वर्तवली जात होती. त्या भेटीनंतर काही नेत्यांनी फक्त शिवसेनेबरोबर युती करण्यापेक्षा महाविकास आघाडीमध्ये जर वंचितचा समावेश झाला तर त्याचा फायदा वंचितलाही होईल अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या. आता पुन्हा एकदा शरद पवार यांची प्रकाश आंबडेकर यांची भेट घेतल्यामुळे मविआमध्ये वंचितची एंट्री अशी आता जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये वंचितची एन्ट्री झाल्यास त्यांचे स्थान कितवे असणार? वंचित महाविकास आघाडीमधील चौथा पक्ष असणार का? किंवा मग वंचित महाविकास आघाडीमध्ये आल्यावर देखील ठाकरे-वंचित असे स्थान असणार अशा काही शक्यता वर्तवल्या जात आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी याआधी अनेकवेळा शरद पवारांवर टीका केली आहे. त्यामुळे या भेटीमागे काय घडले, कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली असे अनेक प्रश्न समोर येत आहेत. त्यामध्ये वंचितला महाविकास आघाडीमध्ये एन्ट्री मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"