पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नव्या संसद भवनाचं उद्घाटन झालं. या सोहळ्यादरम्यान दिल्लीत मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नरेंद्र मोदी यांनी पूजा आणि हवन केल्यानंतर सेंगोलची पूजा केली. मोदींनी सेंगोलच्या राजदंडाला साष्टांग नमस्कार केला. यासोबतच त्यांनी उपस्थित साधूसंताचे आशीर्वादही घेतले. वैदिक मंत्रोच्चाराने संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या कार्यक्रमावर टीका करताना मला आनंद आहे की मी तिथे गेलो नाही, असे म्हटले आहे.
"सकाळी कार्यक्रम पाहिला. पण मला आनंद आहे की मी तिथे गेलो नाही. तिथे जे काही घडले ते पाहून मला काळजी वाटते. आपण देशाला मागे नेत आहोत का? हा कार्यक्रम फक्त मर्यादित लोकांसाठीच होता का?", अशा शब्दांत पवारांनी मोदी सरकारवर टीका केली.
सुप्रिया सुळेंचा हल्लाबोलराष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी देखील नवीन संसद भवनाच्या मुद्द्यावरून भाजप सरकारला लक्ष्य केले. "संसदेचा इव्हेंट करू नका, ते लोकशाहीतलं आमचं मंदिर आहे. ही लोकशाही आहे, दडपशाही नाही", अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी टीका केली. "ही लोकशाही आहे, दडपशाही नाही. लोकशाहीमध्ये विरोधक आणि सत्तेतले असे दोन्ही लोक असले पाहिजेत आणि सर्वांचा समन्वय साधूनच देश चालतो. नऊ वर्षात अनेकदा असं झालं आहे की सरकारमधले महत्त्वाचे मंत्री, त्यांना जेव्हा बिल पास करायचे असतात तेव्हा या देशाच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्यांनी फोन केलेले आहेत", असं त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.