Sharad Pawar: "पवार साहेब राजीनामा मागे घ्या"; कार्यकर्त्यांची कळकळीची विनंती, काही जण रडले, काही पाया पडले!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 01:16 PM2023-05-02T13:16:56+5:302023-05-02T13:54:14+5:30
काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज निवृत्तीची घोषणा केली आहे.
मुंबई- आज महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड घडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्तीची घोषणा शरद पवार यांनी केली आहे. आज मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये 'लोक माझा सांगती' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
यापुढे मी निवडणूक लढवणार नाही, पुढचे तीनच वर्ष राजकारणात राहणार आहे. राष्ट्रवादीच्या पुढच्या अध्यक्षपदासाठी नवीन समिती स्थापन करणार. नवीन समिती अध्यक्षपदाचा निर्णय घेईल, अशी माहिती शरद पवार यांनी यावेळी दिली. त्यांच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी शरद पवारांना आपला निर्णय मागे घेण्याची विनंती केली.
शरद पवारांच्या घोषणेनंतर पक्षाचे अनेक नेते-पदाधिकारी मंचावर गेले आणि शरद पवारांना आपला निर्णय मागे घेण्याची विनंती केली. यावेळी अनेक कार्यकर्ते भावूक झाले, काहींना अश्रू अनावर झाले. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी तर पवारांचे पायही धरले. शरद पवार आगे बढो, हम तुम्हारे साथ है, हमारा नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो, अशा घोषणा शेकडो कार्यकर्त्यांकडून यावेळी देण्यात आल्या.