Maharashtra Politics: उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर अद्याप अंतिम निर्णय येणे बाकी असताना पक्ष आणि चिन्हाप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल देत ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केले. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रासह देशभरात एकच खळबळ उडाली. या निकालावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला असून, यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. निवडणूक आयोगाच्या निकाला विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले. तसेच शिंदे गट आणि भाजपवर सडकून टीकाही करताना दिसत आहे. यातच शिंदे गटानेही सर्वोच्च न्यायालयात धाव घेत कॅव्हेट दाखल केला आहे.
धनुष्यबाणाचा जो वाद सुरू आहे, त्यात पडणार नाही
प्रसारमाध्यमांशी बोलत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयावर प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, सध्या धनुष्यबाणाचा जो वाद सुरू आहे. त्यात मी पडणार नाही, हे मी एकदाच सांगतो, असे शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. शरद पवारांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तत्पूर्वी, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, एकदा निकाल दिल्यानंतर त्यावर चर्चा होत नसते. त्यामुळे नवे पक्ष नाव आणि चिन्ह घेऊन निवडणूकीला सामोरे जायचे असते. लोक फार तर १५ दिवस महिनाभर चर्चा करतात आणि त्यानंतर नवे निवडणूक चिन्ह स्विकारतात. इंदिरा गांधी आणि त्यावेळच्या पक्षातील नेत्यांशी वाद झाला. त्यावेळी त्यांनी पक्षाच्या चिन्हावर आणि नावार दावा केला. मात्र आयोगाने त्यांना त्यावेळचे काँग्रेसचे चिन्ह दिले नाही. त्यामुळे त्यांनी हात हे चिन्ह स्विकारले आणि निवडणूकीला सामोरे गेले, असे शरद पवार म्हणाले होते.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव गटाने आव्हान दिल्यास न्यायालयाने एकतर्फी सुनावणी घेऊन कोणताही आदेश देऊ नये. त्यांची बाजूही ऐकून घ्यावी, अशी विनंती कॅव्हेटद्वारे न्यायालयाला करण्यात आली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"