कोल्हापूर: केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यात धाडसत्र सुरू असताना, महाविकास आघाडी सरकारचे नेते ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या रडारवर असताना राज्यातील गृहखातं फारसं सक्रीय नसल्यानं शिवसेना नेते नाराजी असल्याची चर्चा होती. मात्र आपण मंत्रिमंडळातील कोणत्याही सहकाऱ्यावर नाराज आहे. सर्व सहकाऱ्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
महाविकास आघाडीचे नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर असताना राष्ट्रवादीकडे असलेलं गृह मंत्रालय तितक्या ताकदीनं भाजप नेत्यांच्या मागे लागत नाही, अशी तक्रार शिवसेना नेत्यांची आहे. याबद्दल राष्ट्रवादीची भूमिका काय, असा प्रश्न पवारांना पत्रकारांनी विचारला. त्यावर सत्तेचा गैरवापर करावा असे संस्कार आमच्यावर झालेले नाहीत. तशा संस्कारात आम्ही वाढलेलो नाही. त्यामुळे तसं राजकारण आम्ही करत नाही, असं पवार म्हणाले. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर कोणीच केला नव्हता. मात्र गेल्या काही वर्षांपासून तो अगदी सर्रासपणे सुरू आहे. ईडी नावाची तपास यंत्रणा असते असं सर्वसामान्यांपैकी अनेकांना गेल्या काही वर्षांपर्यंत अनेकांना माहीत नव्हतं. पण आता ईडी हा शब्द रोज कानावर पडतो. ईडी आज याच्याकडे जाते. उद्या त्याच्याकडे जाते. आम्ही तर ईडी येऊन गेल्यानंतर पाहुणे येऊन गेले का, अशी एकमेकांची प्रेमानं चौकशी करतो, असं पवार यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.