Sharad Pawar News: २२ जानेवारी रोजी राम मंदिरात रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. यानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यातच सोहळ्याचा दिवस जसा जवळ येत आहे, तसे राजकीय वातावरण अधिकच तापताना दिसत आहे. एका मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी राम मंदिर मुद्द्यावरून केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. यासाठी पंतप्रधान मोदी यांनी ११ दिवसांचे विशेष अनुष्ठान, व्रताचरण, उपवास करत आहेत. यावरून शरद पवार यांनी टीका केली आहे. राम मंदिराच्या कार्यक्रमाचा मी आदर करतो, पण गरिबी घालवण्यासाठी असा कार्यक्रम सरकार हाती घेईल का? मोदी १० दिवस उपवास करत आहेत. तसाच उपवास देशातील लोकांची उपासमार घालवण्यासाठी करणार का, अशी विचारणा शरद पवार यांनी केली.
भाजप आणि आरएसएस मतांसाठी फायदा करून घेत आहे
अयोध्येचा श्रीराम, हनुमान याबद्दल आम्हाला आदर आहे. मशीद पडल्यानंतर राम मंदिर बांधण्याबाबतचा निर्णय राजीव गांधी यांच्या वेळेस झाला. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते शिलान्यास झाला. राम मंदिराचे काम राहिले बाजूला, मात्र आता भाजप आणि आरएसएस याचा मतांसाठी फायदा करून घेत आहेत, या शब्दांत शरद पवार यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, या सरकारला शेतकऱ्यांची आस्था नाही. या देशात उद्योगपतींची कर्ज माफ होतात. पण शेतकऱ्यांची कर्ज माफ होत नाही. देशात चुकीची आर्थिक धोरण राबवली जात आहेत. अशी चुकीची धोरणे घेणाऱ्या लोकांना बाजूला केले पाहिजे. कर्नाटक राज्यातील निकाल विरोधकांचा आत्मविश्वास वाढवणारा आहे. धार्मिक प्रश्नावर लोकांची मने वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा निशाणा शरद पवार यांनी लगावला.