Sharad Pawar News: अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे कांद्याचे रोप कुजलेले आहे. त्याचेही नुकसान झाले आहे. कांदा उत्पादक हा जिरायत शेतकरी आहे. सरकारचे धोरण धरसोड असेल तर त्याला जबरदस्त किंमत मोजावी लागते. आज ती अवस्था देशात झाली आहे. त्याची सर्वाधिक किंमत महाराष्ट्राला मोजावी लागत आहे. महाराष्ट्रात नाशिक, धुळे, जळगाव आणि सातारच्या काही भागाला हा फटका बसत आहे. जेएनपीटी असेल किंवा अन्य पोर्ट असेल त्या बंदराच्या बाहेर माल येऊन थांबला आहे. काही माल परदेशात पाठवायचा आहे. पण किंमतीच्या धोरणामुळे निर्यात थांबली आहे. धोरण धरसोडीचे आहे. त्यामुळे इतर देश आपल्यावर विश्वास ठेवत नाहीत, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, जेव्हा माझ्याकडे शेती खात्याची जबाबदारी होती. श्रीलंकेला निर्यात करायची होती. तेव्हा कांद्याचे ज्यादा उत्पादन झाले होते. कोलंबला गेलो होतो. त्यावेळी राजपक्षे पंतप्रधान होते. आम्ही त्यांना सांगितले की, आमच्याकडचा कांदा घेतला पाहिजे. ते विनम्रपणे म्हणाले, आम्ही घेणार नाही. मी विचारला का घेणार नाही? कांद्याची गरज नाही का? त्यावर ते म्हणाले, भारत सरकार लोकांचा दबाव आल्यावर निर्यात बंदी घालते. त्यामुळे आमच्या देशात कांद्याचा तुटवडा निर्माण होतो. आमचे लोक आम्हाला शिव्या घालतात. त्यामुळे आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. तुम्ही सतत धोरण बदलता. तुम्ही विश्वासू व्हा, असे ते म्हणाले होते. आपण विश्वास गमावत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात आपली प्रतिमा चुकीची झाली आहे, असा एक किस्सा शरद पवार यांनी सांगितला.
ऊस उत्पादक आणि शेतकऱ्यांना किंमत मोजावी लागली
उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन अधिक होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथेनॉलचे उत्पादन वाढवण्यास सांगितले. त्याला प्रोत्साहन द्यायलाही सांगितले. असे असतानाही ७ डिसेंबर रोजी ऊसाचा रस आणि साखरेच्या सीरपवर केंद्राने बंदी घातली. त्यामुळे त्याची किंमत ऊस उत्पादक आणि शेतकऱ्यांना मोजावी लागली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. त्यात नाशिकचा उल्लेख करावा लागेल, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पिके नष्ट झाली. शेतकरी अडचणीत सापडला आहे. पण कृषीमंत्री शेताच्या बांधावर फिरकायला तयार नाही, असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता. यावर, त्याचे उत्तर मी काय देणार? एक काळ असा होता की, त्यांच्याबद्दल निर्णय घ्यायचा अधिकार आम्हाला होता. पण ते आम्हाला सोडून गायब झाले. त्यामुळे मी त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही, असा खोचक टोला शरद पवार यांनी लगावला.