NCP Sharad Pawar Resign: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून पायउतार होत निवृत्तीची घोषणा केली. याशिवाय राज्यसभेची टर्म संपली की निवडणूक लढवणार नाही, असेही जाहीर केले. शरद पवार यांच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. यानंतर राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. नवीन अध्यक्षाच्या निवडीबाबत समिती स्थापन करण्याची सूचना शरद पवार यांनी केली होती. त्यात कोण नेते असावेत, यांची नावेही सुचवली होती. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेतेमंडळींच्या हट्टानंतर आता शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णायाबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला हवे होते. अध्यक्षपदासाठी जी समिती नेमण्यात आली आहे त्यांनी ५ मे रोजी बैठक घ्यावी. त्या बैठकीत जो काही निर्णय घेण्यात येईल तो आपल्याला मान्य असेल, असे आश्वासन शरद पवार यांनी दिल्याचे सांगितले जात आहे.
हा निर्णय माझ्या मनाशी एकमत करून घेतला
शरद पवार पुढे म्हणाले की, पक्षातील वरिष्ठांना, माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होते असे आता वाटते आहे. जर मी हा निर्णय सर्वांना विचारून घेतला असता तर स्वाभाविकपणे सर्वांनी मला विरोध केलाच असता. म्हणून हा निर्णय माझ्या मनाशी एकमत करून घेतला. पण आपण ६ मे रोजीची बैठक ५ मेलाच घ्या, समिती जो निर्णय घेईल तो मान्य असेल, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीची बैठक ६ मे रोजी होणार होती. पण आता शरद पवारांच्या सूचनेनंतर आता ही बैठक ५ मे रोजी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवार निवृत्तीचा निर्णय मागे घेणार की राष्ट्रवादीला नवा अध्यक्ष मिळणार हे ५ मे रोजी समजेल, असे सांगितले जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"