एकदाही नामोल्लेख नाही, मात्र अजित पवारांवर पलटवार केलाच; पुण्यात शरद पवार बरसले!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 03:28 PM2023-12-02T15:28:48+5:302023-12-02T15:29:28+5:30
"जे काही घडलं त्यामुळे आपली संघटना स्वच्छ व्हायला लागली आहे आणि नवीन लोकांना संधी देण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे," असंही शरद पवार म्हणाले.
पुणे : राष्ट्रवादी अजित पवार गटाने कर्जत येथे घेतलेल्या राज्यव्यापी शिबिरातून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती आरोप करत टीकास्त्र सोडलं. या टीकेला आज पुण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना शरद पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "आज कोणी वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तरीही आम्ही विचारांशी बांधलो गेलो आहोत, आम्ही संधीसाधू नाहीत, हे तुम्ही इथं येऊन दाखवून दिलंत त्याबद्दल तुमचे अभिनंदन. तुम्ही कुणाच्या तिकिटावर निवडून आला, तुमची खूण काय होती, तुम्ही कोणाचा फोटो वापरला, तुमचा कार्यक्रम काय होता आणि आज तुम्ही कुठे गेलात? याचा विचार सामान्य माणूस करत असतो," असं म्हणत शरद पवारांनी बंडखोर गटाला टोला लगावला.
अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, "काही लोकांनी नवीन प्रश्न उपस्थितीत केले, टीका-टिपण्णी केली. ज्या लोकांनी पक्ष सोडला किंवा पक्ष घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, त्या लोकांकडून आज तुमच्या-माझ्यावर टीका केली जात आहे. मात्र त्याचा फारसा विचार करण्याचं कारण नाही. हे लोक जेव्हा लोकांमध्ये जातील तेव्हा जनताच यांना प्रश्न विचारणार आहे. याची कल्पना असल्याने लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी अशी टीका आपल्यावर केली जात आहे. सत्ता येते आणि सत्ता जाते, मात्र सत्ता गेल्यानंतर पुन्हा नव्या उमेदीने उभं राहण्याची भूमिका घेतली तर सामान्य माणसाचा पाठिंबा आपल्याला मिळतो. मात्र सत्ता गेल्यानंतर जे अन्य ठिकाणी जातात, त्यांच्याबद्दल लोकांना आस्था नसते," असा हल्लाबोल शरद पवारांनी केला आहे.
कार्यकर्त्यांना खास संदेश
अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील काही नेत्यांनी वेगळी चूल मांडली असली तरी शरद पवार मात्र आपल्या निर्णयावर ठाम असून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आजच्या बैठकीत खास संदेश दिला आहे. "मला याआधीही काही आमदार सोडून गेले होते. तेव्हा आम्ही लोकांमध्ये गेलो आणि नवीन पीढी उभा केली. तेव्हा सोडून गेलेल्या ६० आमदारांपैकी ५१ ते ५२ जणांचा पराभव झाला होता. त्यामुळे आताही कोणी सोडून गेलं, याची चिंता करण्याची गरज नाही. कारण सामान्य लोकांमध्ये जाऊन जो आपली भूमिका मांडण्यात यशस्वी होतो, त्याच्यामागे लोक उभे राहतात. ती अवस्था पुन्हा एकदा नक्की महाराष्ट्रात पुन्हा बघायला मिळेल. मी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्याशी याबाबत सविस्तरपणे बोलणार आहे. जे काही घडलं त्यामुळे आपली संघटना स्वच्छ व्हायला लागली आहे. तसंच नवीन लोकांना संधी देण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. युवकांची ही संघटना आपण मजबूत करू शकलो तर माझी खात्री आहे की, उद्या जेव्हा विधानसभा निवडणुका होतील तेव्हा ही तरुण पिढी लोकांच्या पाठिंब्याने सत्तेवर बसलेली असेल, अशी स्थिती पाहायला मिळेल. यानिमित्ताने तुम्हा सगळ्यांना एक मोठी संधी मिळाली आहे, याची नोंद घेऊन ज्या विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात आपण राहतो तिथल्या प्रत्येक गावामध्ये आपण कसं जाऊ शकू, कार्यकर्त्यांचा संच आपल्यासोबत कसा राहील आणि आपला विचार शेवटच्या माणसापर्यंत कसा पोहोचवू, यासाठी कष्ट केले पाहिजेत,' असं आवाहन पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं.
दरम्यान, लोकसभेची निवडणूक ३ ते ४ महिन्यांवर आली आहे. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आहे. त्यामुळे जे मतदारसंघ आपण ठरवले आहेत, त्यासाठी तयारी करून ही जागा आम्ही घेणारच असा निर्धार करून तुम्ही पुढची पावलं टाकली पाहिजे, असंही यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटलं आहे.