बारामतीचं मंदिर अन् प्रचाराचा नारळ; राज ठाकरेंच्या 'नास्तिक' टीकेला पवारांचं सडेतोड उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 01:41 PM2022-04-13T13:41:27+5:302022-04-13T13:41:54+5:30
शरद पवार नास्तिक, ते देवधर्म मानत नाहीत; राज यांच्या टीकेला खुद्द पवारांकडून उत्तर
मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नास्तिक आहेत. ते देव-धर्म मानत नाहीत. त्यांच्यामुळेच राज्यात जातीयवाद वाढला, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर केली. राज यांच्या टीकेला शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मी देवधर्माचं प्रदर्शन करत नाही, तो माझा स्वभाव नाही, असं पवार म्हणाले.
शरद पवार नास्तिक आहेत असं कालच्या सभेत राज ठाकरे म्हणाले. देवधर्माचं प्रदर्शन करण्याची मला सवय नाही. निवडणुकीचा प्रचार करताना आम्ही नारळ कुठे फोडतो, याची कल्पना तिथल्या जनतेला आहे. एका मंदिरात नारळ फोडून आम्ही प्रचाराला सुरुवात करतो. पण त्याचा गाजावाजा आम्ही कधी करत नाही, असं पवार यांनी म्हटलं.
राज ठाकरेंनी त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरेंचं लिखाण वाचावं. धर्माच्या नावाखाली बाजार मांडणाऱ्यांवर प्रबोधनकारांनी टीकेची झोड उठवली. त्यांना ठोकून काढलं. त्यांचं लिखाण मी वाचलं आहे. राज यांनीदेखील ते लिखाण वाचावं, असा सल्ला पवारांनी राज यांना दिला.
अजित पवार कोणी तिसरे आहेत का?
अजित पवारांच्या घरी, त्यांच्या सख्ख्या बहिणींच्या घरांवर धाडी पडतात. पण सुप्रिया सुळेंच्या घरांवर धाडी पडत नाहीत, यामागचं कारण काय, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. त्याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, राज यांचा आरोप राजकीय नव्हे, तर वैयक्तिक स्वरुपाचा असल्याचं पवार म्हणाले.
अजित पवारांच्या घरावर छापे पडतात. पण सुप्रिया सुळेंच्या घरावर पडत नाहीत. असं का होतं? हा काय प्रश्न आहे का? असा प्रतिप्रश्न शरद पवारांनी केला. धाडी कोणाकडे पडणार ते आम्ही ठरवतो का? असा प्रश्न पवारांनी विचारला. अजित पवार कोणी तिसरे आहेत का? अजित आणि सुप्रिया ही भावंडं आहेत. त्यामुळे त्यांच्यावर राज यांनी केलेला आरोप वैयक्तिक स्वरुपाचा आहे, तो राजकीय नाही, असं पवारांनी म्हटलं.