मुंबई: ईडी भेटीवरुन टीका करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोला लगावला. शरद पवार ईडी भेटीचा इव्हेंट करत असल्याची टीका पाटील यांनी केली होती. त्यावर ज्यांनी आयुष्यात एकही निवडणूक लढवली नाही, त्यांच्या टिकेला काय उत्तर देणार, असा टोला पवार यांनी लगावला. शरद पवार यांनी रद्द केलेली ईडी भेट आणि अजित पवार यांनी आमदारकीचा दिलेला राजीनामा यामुळे दिवसभर पवार कुटुंब चर्चेत होतं. शिखर बँक घोटाळा प्रकरणात शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानं राजकारण तापलं. त्यानंतर आपण स्वत: ईडीच्या कार्यालयात जाऊन त्यांचा पाहुणचार घेणार असल्याचं पवार यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत जाहीर केलं. मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता असल्यानं मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी शरद पवारांना ईडीच्या कार्यालयात न जाण्याची विनंती केली. त्यामुळे पवारांनी ईडी भेट रद्द केली.शरद पवारांच्या ईडी भेटीच्या मुद्द्यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली. 'आकसानं कारवाई केली जात आहे, म्हणत राष्ट्रवादीकडून आंदोलन सुरू आहे. मग छगन भुजबळांना अटक झाली, त्यावेळी आंदोलन का केलं नाही? पवारांकडून ईडी भेटीचा इव्हेंट सुरू आहे. अन्याय झालं असं वाटत असल्यास त्यांनी न्यायालयात जावं', अशा शब्दांमध्ये पाटील यांनी पवार यांना लक्ष्य केलं. त्यावर पवारांनी पत्रकार परिषदेत दोन वाक्यांमध्ये भाष्य केलं. 'ज्यांनी आयुष्यात एकही निवडणूक लढवली नाही, त्यांच्या टिकेला काय उत्तर देणार. काही गोष्टी या अपघातानं होत असतात', असा टोला पवार यांनी पाटील यांना लगावला.
ईडी भेटीचा इव्हेंट केला म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना शरद पवारांचा टोला; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 12:18 AM