...अन् महाराष्ट्रानं भाजपला येडी ठरवलं; सणसणीत टोले लगावत शरद पवारांनी Sharad Pawar करून दिली आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 12:51 PM2021-10-08T12:51:15+5:302021-10-08T13:13:09+5:30
NCP chief Sharad Pawar hits out at BJP over IT raids at premises linked to Ajit Pawar : ईडीच्या नोटिशीची आठवण सांगत शरद पवारांकडून भाजपचा समाचार
सोलापूर: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्य्या निकटवर्तीयांवर काल आयकर विभागाच्या पथकांनी छापे टाकले. त्यामध्ये अजित पवारांच्या बहिणीच्या कार्यालयांचा समावेश आहे. या छाप्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सोलापुरात तुफान बॅटिंग केली. काल अजित पवारांच्या घरी पाहुणे येऊन गेले. पण पाहुण्यांची चिंता आपल्याला अजिबात वाटत नाही, असा टोला पवारांनी लगावला. यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
NCP chief Sharad Pawar hits out at BJP over IT raids at premises linked to Ajit Pawar :
अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर पडलेल्या छाप्यांवर बोलताना शरद पवारांनी त्यांना सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) पाठवलेल्या नोटिशीची आठवण सांगितली. विधानसभा निवडणुकीआधी मला बँकेसंदर्भात ईडीची नोटीस आली होती. मी त्या बँकेचा सभासदही नव्हतो, ना त्या बँकेकडून मी कधी कर्ज घेतलं होतं. त्यानंतर काय झालं, ते सगळ्यांनी पाहिलं. मला ईडीची नोटीस दिली आणि सबंध महाराष्ट्रानं भाजपाला येडी ठरवलं, अशा शब्दांत शरद पवार यांनी भाजपवर शरसंधान साधलं.
लखमीपूरमध्ये आंदोलक शेतकऱ्यांवर भाजपा नेत्याच्या मुलानं गाडी चढवल्याचा प्रकार घडला. त्यावरूनही पवारांनी जोरदार टीका केली. शांततेत निदर्शनं करणाऱ्या शेतकऱ्यांवर भाजपा नेत्यांनी गाड्या घातल्या; शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालून एक प्रकारे त्यांची हत्याच केली, असा गंभीर आरोप पवारांनी केला. लखीमपूरमधील घटनेच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामध्ये सहभागी होऊन शांततेच्या मार्गानं निषेध नोंदवा, असं आवाहन त्यांनी केलं.
भाजपाकडून सत्तेचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप पवारांनी केला. सत्ता लोकहितासाठी राबवायची असते. पण भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे. देशातील जनता हे सगळं पाहतेय. ही जनताच भाजपाला धडा शिकवेल, असं पवार म्हणाले. रेल्वे, विमानतळ, वाहतूक व्यवस्थेचं खासगीकरण करण्याचा घाट केंद्र सरकारनं घातलाय; स्वातंत्र्यानंतर नेहरूंनी पायाभूत सुविधा उभारल्या; पण मोदी सरकारला रेल्वे स्थानकांचं खासगीकरण करण्यात अधिक रस असल्याची टीका त्यांनी केली.