Sharad Pawar-Supriya Sule: अलीकडेच शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार होत निवृत्ती जाहीर केली होती. शरद पवारांच्या या घोषणेनंतर मोठा गहजब झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, तीन दिवसांतच शरद पवार यांनी निवृत्ती मागे घेतल्याचे पुन्हा जाहीर केले. परंतु, यानंतर सुप्रिया सुळे यांना पक्षात मोठी जबाबदारी दिली जाणार का, सुप्रिया सुळे आता पक्षाची कमान सांभाळणार का, अशी चर्चा सुरू झाली. यावर शरद पवार यांनी सूचक शब्दांत भाष्य केले.
संसदेच्या चर्चासत्रात सहभाग, उपस्थिती, विचारलेले विविध प्रश्न आणि संसदेत मांडलेली खासगी विधेयके याद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर मोहोर उमटवली. सुप्रिया सुळे यांना सर्वोत्कृष्ट संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. सुप्रिया सुळे यांना यापूर्वी तब्बल सात वेळा हा पुरस्कार मिळाला आहे. शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा होतील किंवा सुप्रिया सुळे यांना पक्षात मोठी जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. यासंदर्भात शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. मीडियाशी बोलताना शरद पवार यांनी यावर उत्तर दिले.
सुप्रिया सुळे यांना पक्षात मोठी जबाबदारी दिली जाणार आहे का?
सुप्रिया सुळेंची वेगळी इच्छा आहे. एका वर्षात लोकसभा निवडणूक आहे. त्यांनी आम्हाला सांगितले आहे की, लोकसभेची निवडणूक होईपर्यंत मतदारांव्यतिरिक्त कोणतीही जबाबदारी घेण्यास त्या इच्छूक नाहीत, असे शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. दुसरीकडे, सोलापूर हे सामान्य कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारा गाव आहे. त्यामुळे माझी अनेक वर्षांपासून कामाची एक पद्धत आहे. मी जेव्हा नव्याने कामाला सुरूवात करतो, तेव्हा सोलापूर किंवा कोल्हापुरातून करतो. त्यामुळे मी राजीनामा मागे घेतल्यानंतर सोलापुरातून नव्याने कामाला सुरूवात करण्याचा निर्णय घेतला आहे. आता महाराष्ट्राचे चित्र बदलण्यासाठी एकजूटीने लढू. नवी ऊर्जा घेऊन लोकांच्या अडचणी समजून घेऊ, असे शरद पवार म्हणाले.
दरम्यान, नितीश कुमार हे मुंबई दौऱ्यावर आहेत. या दिवशी आपण त्यांना भेटणार का, असे विचारले असता शरद पवार म्हणाले, त्यांचा मॅसेज आला आहे. त्यांची भेट होण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी चर्चा करू. सध्या भाजपला पर्याय देण्याची गरज आहे. त्यामुळे नितीश कुमार असतील किंवा ममता बॅनर्जी यांच्यासोबत समन्वय राखणे गरजेचे आहे. यांना साथ देणे, सहकार्य करणे ही माझी भूमिका राहणार आहे, असे शरद पवार म्हणाले.