बारामती: सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं गेल्या आठवड्यात घेतला. या निर्णयाला मोठा विरोध होत आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. राज्य सरकारनं घेतलेला निर्णय आणि त्याला होत असलेला विरोध हा काही फार चिंतेचा विषय नाही. जर अनेक स्तरातून विरोध होत असेल आणि राज्य सरकारनं या संदर्भात निर्णय बदलला तरी त्याचं मला वाईट वाटण्याचं कारण नाही, असं शरद पवार म्हणाले.
बारामतीमधील गोविंदबाग या निवासस्थानी शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. सुपर मार्केटमध्ये वाईन उपलब्ध करून देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर भाजपसह काही संघटनांनी विरोध केला आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. त्यावर वाईन हा काही चिंतेचा विषय नाही. जर अनेक स्तरातून विरोध होत असेल आणि त्यामुळे सरकारनं हा निर्णय मागे घेतला तरी त्याबद्दल वाईट वाटण्याचं कारण नाही, असं पवार म्हणाले.
देशभरातील सर्वच राज्यांमध्ये दुकानांमध्ये देशी आणि विदेशी दारू मिळते. त्यामध्ये वाईनचा खप अत्यंत तुलनेने कमी आहे. देशातील सर्वाधिक द्राक्ष उत्पादन हे नाशिक जिल्ह्यात होते. या जिल्ह्यामध्ये अठरा वाईनरी आहेत. ही वाईन केवळ मोठ्या मॉल्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासंदर्भात सरकारनं मंजुरी दिली आहे. वाईनरींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळते. मात्र त्याला विरोध होत असल्यानं सरकारनं या संदर्भात घेतलेला निर्णय मागे घेतला तरी त्याचे काही वाईट वाटायचं कारण नाही, अशा शब्दांत पवारांनी त्यांचं मत मांडलं.