Maharashtra Political Crisis: आताच्या घडीला देशात आणि राज्यात अनेकविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या अभूतपूर्व ऐतिहासिक बंडानंतर राज्यातील राजकीय संघर्ष शिगेला गेला आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. भाजपने शिंदे गटाला पाठिंबा देत नवे सरकार स्थापन केले आणि यानंतर आता महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस चव्हाट्यावर येत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही सर्वकाही आलबेल नसल्याचे सांगितले जात आहे. विरोधी पक्षनेतेपदावरून जयंत पाटील (Jayant Patil) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात वाद झाल्याने अखेर शरद पवार (Sharad Pawar) यांना मध्यस्थी करून नाराजी दूर करावी लागली, अशी माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक बंगल्यावर राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीवेळी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या वाद झाल्याचे सांगितले जात आहे. अखेर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मध्यस्थी केली आणि जयंत पाटील यांची समजूत काढत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.
राष्ट्रवादीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांची बैठक
शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राज्याचे आगामी पावसाळी अधिवेशन, या अधिवेशनात विरोधी पक्षांची रणनीति काय असायला हवी तसेच राज्यातील कोणत्या मुद्द्यांवरून शिंदे-फडणवीस सरकारला घेरता येऊ शकेल, याबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अजित पवार यांना विधानसभेतील विरोधी पक्षनेता केल्यामुळे जयंत पाटील हे नाराज होते, अशी चर्चा आधीपासूनच राजकीय वर्तुळात होती. यावर बोलताना आपण नाराज नसल्याचा दावाही जयंत पाटील यांनी केला होता. मात्र, या बैठकीत शरद पवार यांनी या वादात मध्यस्थी करत जयंत पाटील यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करून दोन्ही नेत्यांना एकमेकांसोबत चांगले काम करण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, या बैठकीत शरद पवार यांनी दोन्ही नेत्यांशी चर्चा केली. विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय पक्ष स्तरावर घेण्यात आला होता. अजित पवार यांना विरोधी पक्षनेता म्हणून ३० ते ३५ आमदारांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे अजित पवार यांची नियुक्ती निश्चित करण्यात आली. तत्पूर्वी जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या नियुक्तीचे पत्र विधानसभा अध्यक्षांना वेळेत दिले नव्हते. प्रफुल्ल पटेल यांनी दोनवेळा फोन करून पाठपुरावा केल्यावर ते देण्यात आले. त्यामुळे जयंत पाटील यांची या निवडीवर नाराजी होती, असा मोठा दावा करण्यात येत असून, या नाराजी नाट्याची चर्चा राजकीय वर्तुळात असल्याचे सांगितले जात आहे.