Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले असून, पक्षातील गळती थांबताना दिसत नाही. केवळ शिवसेनेचेच नाही, तर राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसेमधील कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते शिंदे गटाला पाठिंबा देत आहेत. एकीकडे शिंदे गटाची ताकद वाढत असताना दुसरीकडे भाजपमध्येही जोरदार इन्कमिंग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच साखरसम्राट अशी ख्याती असलेले तरुण उद्योजक भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू असतानाच पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांना रस्त्यात गाठले, आपल्या कारमध्ये घेतले आणि दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.
ईडीची धाड पडल्यानंतर अनेक दिग्गज नेते भाजपच्या छत्र छायेखाली जात आहेत. आता या नेत्यांच्या यादीत उद्योजकांची नावे जोडली जाऊ लागली आहेत. पंढरपूर येथील तरुण उद्योजक आणि साखरसम्राट अशी ओळख असलेले अभिजित पाटील (Abhijit Patil) यांच्यावर आयकर विभागाने छापेमारी केल्यानंतर ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, यावर शिक्कामोर्तब होण्याआधीच शरद पवार यांनी त्यांना गाठले आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. त्यामुळे आता अभिजित पाटील कोणत्या पक्षात प्रवेश करतात, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे.
प्रवीण दरेकरांनी घेतली होती भेट
अभिजीत पाटील यांनी गेल्या काही वर्षांत राज्यात चार खासगी कारखाने विकत घेतले होते. सोलापूरमधील २० वर्षांपासून बंद पडलेला कारखाना त्यांनी चालवायला घेतला होता. हा कारखाना त्यांनी यशस्वीपणे चालवून दाखवला. यानंतरच ते आयकर विभागाच्या रडावर आले. त्यांच्या चारही कारखान्यांवर ईडीने धाड टाकली. या प्रकरणात जास्त काही माहिती समोर आली नाही. भाजपचे आमदार प्रविण दरेकर यांनी अभिजित पाटील यांच्यासह जाहीर पत्रकार परिषद घेत, ते यातून लवकरच बाहेर पडतील, असा विश्वास व्यक्त केला होता. त्यामुळे अभिजित पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगितले जात होते.
दरम्यान, आयकर छाप्याच्या कारवाई नंतर अभिजीत पाटील यांना सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना ते दिसले. शरद पवारांनीच अभिजीत पाटील यांना थेट आपल्या कारमध्ये बसवुन चर्चा केली. या दोघांमध्ये काय चर्चा झाला याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे अभिजित पाटील राष्ट्रवादीचे घड्याळ की भाजपचे कमळ हातात घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल्याचे सांगितले जात आहे.