Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिर्डी दौऱ्यावर असताना साईबाबा मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर अचानक आपल्या नियोजित कार्यक्रमात बदल केला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी सिन्नरमधील ईशान्येश्वर मंदिराला भेट दिली. यानंतर एकनाथ शिंदेंनी ईशान्येश्वर मंदिरामध्ये एका ज्योतिषाकडून आपले भविष्य जाणून घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही यावर भाष्य करत एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.
पुरोगामी विचारांचे राज्य असा लौकिक असलेल्या महाराष्ट्रात या नवीन गोष्टी पाहायला मिळत आहेत. पण या गोष्टीचा स्वीकार करत नाही हे जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही. आसाममध्ये काय घडले हे सर्व देशाला माहिती आहे. आता पुन्हा एकदा आसामची ट्रीप होणार असल्याचे वाचले. त्याच्याशी सुसंगत कार्यक्रम बंद करुन शिर्डीला जाणे आणि नंतर सिन्नरला जाऊन कोणाला तरी हात दाखवणे या गोष्टी आमच्यासाठी नवीन आहेत, असा खोचक टोला शरद पवारांनी लगावला.
महाराष्ट्रात याआधी असे होत नव्हते
सरकारच्या स्थिरतेबद्दल वेगवेगळे प्रश्न निर्माण केले जात आहेत. दोन महिन्यांत हे सरकार कोसळेल असा दावा केला जात आहे. तसेच मुख्यमंत्री वारंवार बैठका घेत असून देवदर्शन करत आहेत, यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, मी काही ज्योतिषी नाही, त्यामुळे मी काही सांगू शकणार नाही. माझा त्यावर विश्वासही नाही, त्यामुळे मी दौरा सोडून हात दाखवायला कुठे जात नाही. आपण आता हल्ली नवीन गोष्टी पाहत आहोत. महाराष्ट्रात याआधी असे होत नव्हते, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर प्रतिक्रिया देताना, प्रत्येकाची श्रद्धा असते. श्रद्धेवर आमचा सर्वांचा विश्वास आहे, पण अंधश्रद्धेवर नाही. डॉ. नरेंद्र दाभोलकर महाराष्ट्राची एक वेगळी ओळख आहे. त्यांनी अंधश्रद्धेविरोधात खूप मोठे काम या राज्यात आणि देशात उभे केले. अंधश्रद्धा निर्मुलनाच्या कामासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी त्यांचे आयुष्य पणाला लावले. त्यामुळे महत्त्वाच्या पदावर असणाऱ्यांनी श्रद्धा ठेवली पाहिजे, मात्र, अंधश्रद्धेवर महाराष्ट्रात एक वेगळे मत आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"