Sharad Pawar Replied CM Eknath Shinde: गेल्या काही दिवसांपासून कांदा प्रश्न चांगलाच तापलेला पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारने कांदा खरेदी दर जाहीर केले असले तरी त्यानुसार खरेदी होत नसल्याचा दावा करत राज्यातील अनेक ठिकाणी लिलाव प्रक्रिया शेतकऱ्यांनी बंद पाडली. विरोधक महाविकास आघाडीतील नेत्यांकडून कांदाप्रश्नी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कांदाप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे.
केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क लावण्याचा निर्णय घेतला. यानंतर कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्यानंतर सरकारने २ लाख मेट्रिक टन कांदा २,४१० रुपये प्रतिक्विंटल या दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर शरद पवारांनी सरकारने ४ हजार रुपये प्रतिक्विंटल या दराने कांदा खरेदी करावा, अशी मागणी केली होती. यावर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, शरद पवार हे मोठे नेते आहेत. ते १० वर्ष देशाचे कृषीमंत्री होते. त्यावेळीही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु, संकटकाळात त्यांनी कांद्याबाबत असा निर्णय घेतला नाही, अशी प्रतिक्रिया देताना टीका केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या टीकेला आता शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे.
त्यांचे म्हणणे मान्य करेन, पण...
मी कृषी मंत्री असताना चाळीस टक्के कर कधी लावला नव्हता. युतीत हा प्रश्न झाला कसा, तुम्ही ४० टक्के कर लावला कसा? तुम्ही ४० टक्के निर्यात शुल्क रद्द करा प्रश्न संपतो. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणत आहेत, त्याला काही अर्थ नाही. ते अर्धवट माहिती देत आहेत. त्यांनी ४० टक्के निर्यात शुल्क वाढवल्याबद्दलचा खुलासा करावा. तो रद्द होत असेल तर त्यांचे म्हणणे मी मान्य करेन, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच साखरेच्या निर्यातीवरून बंधन आणावीत याबाबत चर्चा केंद्र सरकारच्या मंत्रालयात चालू आहे. याबाबत माझी काही लोकांची चर्चा सुरू आहे. यातून साखरेवर सुद्धा निर्यात निर्यातीवर बंधने येतील आणि ही बंधने झाली तर बाजार भाव खाली येतील, असे शरद पवार यांनी सांगितले.
दरम्यान, अजित पवार हे आमचेचे नेते आहेत ,राष्ट्रवादीत फुट नसल्याचे शरद पवार यांनी सांगत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर लगेच त्याला पक्षात फूट पडली असे म्हणू शकत नाही, असे शरद पवारांनी म्हटले आहे. दादा आमचे नेते आहेत,असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतेच केले आहे .आज ज्येष्ठ नेते पवार यांनी सुळे यांच्या या विधानाचे समर्थन केल्याचे दिसून येते . शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत.