मुंबई: राज्यात एकीकडे सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले असताना दुसरीकडे देशात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची (Presidential election 2022) रणधुमाळी सुरू आहे. अनेक उमेदवारांच्या नावाचे प्रस्ताव दिल्यानंतर अखेरिस विरोधकांनी यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून निश्चित केले आहे. तर भाजपकडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची उमेदवारी का नाकारली, याचे खरे कारण सांगितले आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यश येण्याची स्थिती नव्हती, असा खुलासा शरद पवार यांनी केला आहे.
विरोधक आणि भाजपकडून उमेदवार निश्चित होण्यापूर्वी शरद पवार यांचे नाव संयुक्त विरोधी पक्षांकडून आघाडीवर होते. शरद पवार हे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार व्हावेत अशी इच्छा अगदी ममता बॅनर्जींपासून ते काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांनीही बोलून दाखवली होती. मात्र शरद पवार यांनी उमेदवारी स्वीकारण्यास नकार दिला. सर्वच विरोधी पक्षांचा आग्रह असतानाच पवार यांनी ही उमेदवारी का नाकारली याबद्दल मोठा खुलासा केला.
यात यश येण्याची स्थिती नव्हती
भाजपा सोडून देशातील सर्व राजकीय पक्षांनी मला राष्ट्रपतीपदासाठी आग्रह केला होता. पण माझे व्यक्तिगत मत स्पष्ट होते की ही जबाबदारी किंवा हे काम स्वीकारू नये. यात यश येण्याची स्थिती नव्हती, असे शरद पवार म्हणाले. तसेच पुढे बोलताना त्यांनी, यदाकदाचित यश आले असते तर माझ्यासारख्या माणसाला अखंड एका ठिकाणी बसणे, कुठेही बाहेर न जाणे, लोकांशी सुसंवाद न ठेवणे या सगळ्या गोष्टी त्रासदायक झाल्या असत्या. त्यासाठी हा आपला रस्ता नाही हा विचार असल्याने मी नाही म्हणून सांगितले, असे शरद यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, औरंगाबाद येथे बोलताना, नामांतराचा निर्णय घेणार हे मला माहिती नव्हते. नामांतराच्या निर्णयाबाबत योग्य पद्धतीने माहिती देण्यात आली नाही. औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नामांतर करताना सुसंवाद साधला गेला नाही. थेट मंत्रिमंडळात प्रस्ताव मंजूर झाल्यावरच याबाबत समजले. नामांतराच्या मुद्द्यावर हवी तशी चर्चा झाली नाही. नामांतरापेक्षा इतर मूलभूत प्रश्नावर लक्ष देणे गरजेचे होते. नामांतराचा मुद्दा हा किमान समान कार्यक्रमाचा भाग नव्हता, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.