औरंगाबाद: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन राज्याचा कारभार चालवायला सुरुवात केली आहे. मात्र, त्यापूर्वी एकनाथ शिंहे यांच्यासह ३८ हून अधिक आमदारांनी बंडखोरी केली. यानंतर राज्यात पराकोटीला गेलेल्या सत्तासंघर्षामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची नामुष्की ओढावली. उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशीव करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. यानंतर एका जवळपास आठवड्याभरानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी यावर भाष्य केले असून, नामांतराच्या प्रस्तावाबाबत काहीच माहिती नव्हते, असा दावा केला आहे.
शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना अनेकविध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली. एकनाथ शिंदे गटाचे बंड एका दिवसात झालेले नाही. खूप दिवसांपासून बंडाची तयारी केली गेली असेल. मात्र, या बंडाच्या निर्णयाला काहीच आधार नाही. त्यामुळे भविष्यात बंडखोरांना जनतेसमोर येऊन खरे कारण सांगावे लागेल. मध्यावधी निवडणुका लागतील असे मी म्हणालो नाही. पुढील निवडणुकांसाठी आतापासूनच तयारीला लागा असे सांगितले आहे. आपल्या हातात दोन वर्ष आहे. हे लक्षात ठेऊन कामाला लागले पाहिजे. सन २०२४ साली निवडणूक एकत्र लढवावी अशी मनस्थिती आहे. मविआ म्हणून एकत्र लढावे अशी माझी इच्छा आहे. पण, अद्याप एकत्र लढवण्यावर चर्चा नाही. जेव्हा परिस्थिती येईल तेव्हा ठरवू, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
नामांतराचा निर्णय घेणार हे मला माहिती नव्हते
नामांतराचा निर्णय घेणार हे मला माहिती नव्हते. नामांतराच्या निर्णयाबाबत योग्य पद्धतीने माहिती देण्यात आली नाही. औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नामांतर करताना सुसंवाद साधला गेला नाही. थेट मंत्रिमंडळात प्रस्ताव मंजूर झाल्यावरच याबाबत समजले. नामांतराच्या मुद्द्यावर हवी तशी चर्चा झाली नाही. नामांतरापेक्षा इतर मूलभूत प्रश्नावर लक्ष देणे गरजेचे होते. नामांतराचा मुद्दा हा किमान समान कार्यक्रमाचा भाग नव्हता, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, बहुमत चाचणीसाठी राज्यपालांनी खूपच तत्परता दाखवली. पहिल्यांदा अशी तत्परता दाखवणारे राज्यपाल पाहिले. ४८ तासाच्या आत बहुमत चाचणीचा निर्णय राज्यपालांनी दिला, असा टोला शरद पवार यांनी लगावला. तसेच सर्वोच्च न्यायालयात ११ जुलै रोजी होणाऱ्या सुनावणीबाबत बोलताना, न्यायपालिकेवर माझा पूर्ण विश्वास आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.