Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा देशभर गाजताना दिसत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर भाजप आणि शिंदे गट चांगलेच आक्रमक झाला असून, राज्यभरात आता सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सावरकर हा काही राष्ट्रीय मुद्दा नाही, असे म्हटले आहे.
मीडियाशी बोलताना शरद पवार म्हणाले की, सावरकर आता आपल्यात नाहीत. त्यांच्याबाबत काही वादग्रस्त गोष्टी असल्या तरी काही चांगल्याही बाजू आहेत. त्यामुळे हा विषय टाळायला हवा. आमची लढाई भाजपाविरोधात आहे. सावरकर हा काही राष्ट्रीय मुद्दा नाही. विरोधी पक्षांच्या एका बैठकीत मी सावरकरांचे काही सकारात्मक मुद्देही लक्षात आणून दिले. त्यांचे काही वादग्रस्त मुद्दे आहेत. परंतु त्यामुळे त्यांच्या चांगल्या बाजूकडे दुर्लक्ष करता येत नाही. राहुल गांधी आपले मत मांडू शकतात. त्यांना स्वातंत्र आहे. इतरांनाही ते आहे, असे शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.
राज्यात लोकसभा व विधानसभेच्या एकत्रित निवडणुका होणार, असे मला वाटत नाही
दुसरीकडे, राज्यात लोकसभा व विधानसभेच्या एकत्रित निवडणुका होणार, असे मला वाटत नाही. ईव्हीएमविरोधाबाबत सगळे विरोधी पक्ष एकत्र आहोत. मध्यंतरी देशातील तपास यंत्रणेचा विरोधी पक्षातील राजकीय नेत्यांविरोधात दुरूपयोग होत असल्याचे पत्र राष्ट्रपतींना दिले. त्यात काही उदाहरणे दिली आहेत, असे शरद पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले. तसेच परदेशात जाऊन स्वत:च्या देशाबद्दल बोलण्याच्या विषयात मला फारसे काही महत्त्वाचे वाटत नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्व मान्य नव्हते. सावरकर आणि संघाचे विचार भिन्न आहेत. संघ आणि सावरकरांच्या विचारात मेळ नाही. संघ सावरकरांचे हिंदुत्व मानत नाही. मग सावरकरांचे विचार कसे नेणार? आम्ही सावरकरांचे हिंदु्त्व स्वीकारले. सावरकरांना शेंडी जानव्याचे हिंदुत्व मान्य नव्हते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही शेंडी जानव्याचे हिंदुत्व मान्य नव्हते. बाळासाहेबांनीच सावरकरांचे विचार पुढे नेले. सावरकर यात्रा ही राजकीय अजेंड्यासाठीच काढली जात आहे, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"