Sharad Pawar: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येला जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले. शिंदे गटासह भाजपचे नेते, मंत्रीही अयोध्या दौऱ्यावर गेलेत. यावरून आता महाविकास आघाडी आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही अयोध्या दौऱ्यावर टीकास्त्र सोडले आहे.
“सुरत, गुवाहाटीला रामाची आठवण झाली नाही का? रामाचे सत्यवचन तुम्ही कुठून आणणार?”
अयोध्या दौरा सत्ताधाऱ्यांना महत्त्वाचा वाटतो. त्यासाठी मंत्रिमंडळातील खासदार, आमदार अयोध्येत जाऊन बसलेत. याचा अर्थ मूळ प्रश्नांना बगल देणे आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, हा श्रद्धेचा प्रश्न असल्याचे सत्ताधाऱ्यांनी सांगितले आहे. त्यांची श्रद्धा अयोध्येत आहे. आमची श्रद्धा शेतकऱ्यांवर आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीशी निगडीत आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पुसत, संकटातून त्याला मदत कसे करता येईल, यावर आमची श्रद्धा आहे. प्रत्येकाचे धोरण वेगळे असू शकते, असा टोला शरद पवारांनी लगावला.
कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव होणार
कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव होणार आहे. तिथे काँग्रेस सत्तेवर येणार आहे. लोकांना बदल हवा आहे. तो बदल भाजपाला घरी बसवणार आहे, असा मोठा दावा शरद पवारांनी केला. तसेच सद्यस्थितीत ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. त्यामुळे शेती माल निर्यातीवर परिणाम झाला आहे. आमच्याकडे शेती मंत्रीपद होत तेव्हा राज्यासह देशभरात अनेक उपक्रम राबविले. शेतीला आणि शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले, मात्र आज चित्र वेगळे आहे, या शब्दांत शरद पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.
दरम्यान, सरकारचा शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यामुळे आपल्या सर्वांनी सोबत यायला हवे. सरकारचे धोरण बदलायचे असेल तर आपल्याला ही गोष्ट करावीच लागेल. सद्यस्थितीत सरकार धोरण शेतकरी विरोधी असल्याचे दिसते आहे. सरकारने जर मनावर घेतले तर आपला शेतकरी महाराष्ट्र काय देशाची गरज भागवू शकतो. कांद्याच्या किमती कोसळल्या आहेत. त्याला कारणीभूत सरकार आहे, हे धोरण बदलायला हवे, तुम्ही आम्ही सोबत असल्यावर हे शक्य आहे, सरकार बदलायले हवे, हे काम तुम्हाला आम्हाला करावेच लागणार आहे, असे आवाहन शरद पवार यांनी केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"